|| तुषार वैती

आठवडय़ाची मुलाखत : ध्रूव मोहिते, राष्ट्रीय विजेता मोटारस्पोर्ट्स शर्यतपटू

लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असे म्हणतात. कोल्हापूरच्या ध्रूव मोहितेच्या बाबतीतही तसेच घडले. लहानपणापासूनच गाडय़ांची प्रचंड आवड असल्यामुळे मोटारस्पोर्ट्स या खेळाकडे वळलेल्या ध्रूवने आजोबांपासून सुरू असलेला मोटारस्पोर्ट्सचा वारसा पुढे चालवला. त्याने वयाच्या आठव्या वर्षीच राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली. १० वर्षे गो-कार्टिगचा सराव करत त्याने आपली भक्कम पायाभरणी केली. २०१३, २०१४ आणि २०१५ साली फॉर्म्युला रेसिंगमध्ये सहभागी होत त्याने अव्वल चार जणांमध्ये स्थान मिळवले. २०१६ साली सलून कार रेसिंगकडे वळलेल्या ध्रूवने काही दिवसांपूर्वी नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर रंगलेल्या फोक्सवागेन अमियो चषक शर्यतीत राष्ट्रीय विजेता होण्याचा मान पटकावला. महाराष्ट्राकडे राष्ट्रीय विजेतेपद खेचून आणलेल्या ध्रूव मोहितेशी केलेली ही खास बातचीत-

  • कोल्हापूर ते राष्ट्रीय विजेता हा प्रवास कसा होता?

वडिलांचे राष्ट्रीय स्तरावर ड्रायव्हर होण्याचं स्वप्न अधुरे राहिल्यामुळे त्यांनी २००६ मध्ये कोणत्याही नफ्याची अपेक्षा न बाळगता कोल्हापुरात मोहिते रेसिंग ट्रॅकची उभारणी केली. मोटारस्पोर्ट्सची आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या एफआयएची मान्यता असलेल्या या ट्रॅकवर रेसिंगचे धडे गिरवल्यानंतर मी खऱ्या अर्थाने मोटारस्पोर्ट्स या खेळाकडे वळलो. याच ट्रॅकने पार्थ घोरपडे, कृष्णराज महाडिक, चित्तेश मंदोडी यांसारखे अव्वल ड्रायव्हर या ट्रॅकने घडवले आहेत. या सर्वाचे श्रेय वडील, प्रशिक्षक, अभियंते यांना जाते. मोटारस्पोर्ट्स हा खर्चीक खेळ असल्याने घरच्यांच्या पाठिंब्यामुळे मी या खेळात टिकून आहे.

  • अलीकडेच तू राष्ट्रीय विजेतेपद पटकावलेस, त्याबद्दल काय सांगशील?

गेली पाच महिने मी या स्पर्धेसाठी मेहनत घेत असलो तरी दोन वर्षांपासून माझी या स्पर्धेसाठी तयारी सुरू होती. कोणत्याही परिस्थितीत ही स्पर्धाजिंकायची आणि विजेतेपद कोल्हापूरकडे घेऊन यायचे, हा चंग मी मनाशी बांधला आहे. गेल्या वर्षी तिसरा आल्यानंतर मी कुठे कमी पडत होतो, त्याची तयारी मार्च महिन्यापासून सुरू केली होती. आता जेतेपद पटकावल्याचा अभिमान वाटत आहे.

  • रेसिंग आणि अपघात हे जणू समीकरणच बनले आहे, तुझा अनुभव कसा होता?

रेसिंग करत असाल तर तुम्हाला मोठय़ा अपघाताची सवय करायला हवी. गेल्या वर्षी अमियो चषक स्पर्धेच्या पहिल्याच शर्यतीआधी सराव करताना माझा मोठा अपघात झाला होता. कार पलटी होऊन गाडीचा पूर्णपणे चुराडा झाला होता. मात्र हार न मानता मी पुढच्याच दिवशी सराव शर्यतीत पहिला क्रमांक पटकावला होता. कार चालवताना चुका होतात, पण रेसिंगमधील चूक ही मोठी असते. अपघात होणार, हे मानूनच कार चालवावी लागते.

  • फॉर्म्युला-वन शर्यतींमुळे देशातील मोटारस्पोर्ट्सची स्थिती सुधारण्यास मदत झाली का?

सरकारकडून मिळणारी मदत आणि त्याबाबतचे वादविवाद बाजूला सोडले तर फॉर्म्युला-वन शर्यतीचा बराच फायदा आम्हाला झाला आहे, कारण त्यानिमित्ताने बुद्ध इंटरनॅशनल सर्किट हा जगातील दुसरा वेगवान ट्रॅक आम्हाला मिळाला आहे. तेथील सोयीसुविधा उत्तम आहेत. या ट्रॅकच्या उपलब्धतेमुळे देशातील मोटारस्पोर्ट्सच्या संख्येतही वाढ झाली आहे.

  • अनेक तरुण मुले मोटारस्पोर्ट्स या खेळाकडे आकर्षित होऊ लागलीत, हे चित्र कितपत आशादायी आहे?

भारतातील ८० टक्के मोटारस्पोर्ट्स हा चेन्नई, कोईम्बतूर या भागात चालतो आणि उर्वरित देशात २० टक्के. तिथं आधीपासूनच कार्टिग ट्रॅक, रेसिंग ट्रॅक या खेळांविषयी उत्सुकता असल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर खेळाडू या भागातून येत आहेत. जर कोल्हापुरातून आपण पाच राष्ट्रीय चॅम्पियन घडवू शकतो तर महाराष्ट्रात या खेळासाठीच्या सोयीसुविधा उभारण्यात आल्यावर मुंबई-पुण्यातून अनेक राष्ट्रीय विजेते घडवू शकतो, हा विश्वास मला आहे. सोयीसुविधा नसल्यामुळे खरी गुणवत्ता बाहेर येत नाही.