|| धनंजय रिसोडकर

आठवडय़ाची मुलाखत : दुर्गा देवरे, भारताची धावपटू

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ

खूप मोठी ध्येये जोपासली असली, तरी त्यांचे दडपण मी बाळगत नाही. त्यामुळेच भवितव्याचा विचार करताना केवळ यंदाच्या मोसमातील प्रमुख स्पर्धाच्या विजेतेपदाचे लक्ष्य निश्चित करते. पुढील दोन महिन्यांनी जपानला होणारी आशियाई कनिष्ठ गट स्पर्धा आणि त्यानंतर फिनलंडला होणाऱ्या जागतिक कनिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पदक पटकावण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे, असे भारताची उदयोन्मुख धावपटू दुर्गा देवरेने सांगितले.

कोलंबोमध्ये नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई कनिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील १५०० मीटरच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या दुर्गाने सुवर्णपदकावर नाव कोरले. ३०हून अधिक राष्ट्रीय व ४०पेक्षा जास्त राज्यस्तरीय स्पर्धामध्ये तीने पदके पटकावले आहेत.

निसर्गत:च शिडशिडीत शरीरयष्टी आणि उत्तम उंची लाभलेल्या अवघ्या १९ वर्षांच्या दुर्गाला खेळाचा वारसा घरातूनच मिळालेला आहे. वडील प्रमोद देवरे व्हॉलीबॉलपटू आणि आई क्रीडा शिक्षिका अशी पार्श्वभूमी लाभलेल्या दुर्गाशी तिच्या भावी वाटचालीविषयी केलेली खास बातचीत-

  • बालपणापासून पालकांचे प्रोत्साहन मिळाल्याचा कितपत फायदा झाला?

माझा मोठा भाऊ चांगला धावपटू होता. त्यामुळे आई दररोज त्याला नाशिकच्या भोसला सैनिकी शाळेच्या मैदानावर घेऊन जायची. त्या वेळी मीपण आईबरोबर जायचे. अर्थात त्या वेळी मला काहीच समजत नव्हते, पण दादा धावायचा म्हणून मीपण गंमत म्हणून मैदानाला एक-दोन फेऱ्या मारायला लागले. तिसरीत जाईपर्यंत सहज धावत असताना मी प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले. त्या वेळी पदक मिळाले नाही, मात्र स्पर्धेचा चांगला अनुभव मिळाला. त्यानंतर पाचवीत असताना साताऱ्याला झालेल्या ३०० मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले आणि मग माझे पालक या खेळाबाबत माझा गांभीर्याने विचार करायला लागले. अर्थात आई आणि वडिलांचा भक्कम पाठिंबा आणि सर्व प्रकारचे सहकार्य मिळाल्यामुळेच मी इथपर्यंत मजल मारू शकले.

  • इथपर्यंतच्या वाटचालीत कोणाचे योगदान महत्त्वाचे ठरले?

माझ्या वाटचालीत आई-वडील आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले आहे, किंबहुना माझ्या यशामागे त्यांच्या प्रयत्नांचे योगदान शब्दातीत आहे.

  • पहिले मोठे यश आणि त्यानंतरच्या कारकीर्दीकडे तू कसे पाहतेस?

सातवीत असताना मी १४ वर्षांखालील गटात ८०० मीटरच्या शर्यतीत पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळले आणि त्यातदेखील सुवर्णपदक पटकावले. महिंद्रासारख्या कंपनीकडून प्रायोजकत्वदेखील लाभल्याने पालकांवरील आर्थिक भार काहीसा हलका होण्यास मदत मिळाली. त्यानंतर मग मी परत मागे वळून बघायचे नाही, असा निर्धार केला.

  • कनिष्ठ गटाच्या आशियाई आणि जागतिक स्पर्धेसाठी काही ध्येय ठरवले आहेस का?

प्रत्येक स्पर्धेत उतरताना तिथे पदक मिळवण्याच्या ईष्र्येनेच मी उतरत असते. त्याप्रमाणेच जपान आणि फिनलंडला होणाऱ्या या दोन्ही स्पर्धामध्ये मला पदक मिळवायचे आहे. त्यामुळे माझा नियमित सराव तसेच काही विशेष शारीरिक व मानसिक तयारी करूनच मी स्पर्धेत उतरणार आहे.

  • सध्या कनिष्ठ गटात धावतेस, पुढील वर्षी वरिष्ठ गटात धावशील, त्या दृष्टीने तू काय लक्ष्य ठरवले आहेस?

सध्या भारताची पी.यू. चित्रा ही वरिष्ठ गटात १५०० मीटरमध्ये अग्रस्थानी असून तिची सर्वोत्तम वेळ ही ४ मिनिटे १५ सेकंद आहे, तर माझी आतापर्यंतची सर्वोत्तम वेळ ४ मिनिटे २३ सेकंद असून, हा फरक येत्या वर्ष-दीड वर्षांत मला भरून काढायचा आहे. त्यानंतरच मी माझे पुढचे लक्ष्य निर्धारित करणार आहे.