आठवडय़ाची मुलाखत : प्रेमचंद डेगरा, माजी शरीरसौष्ठवपटू

मुंबईमधील ‘बॉडी एक्स्पो’ म्हणजे शरीसौष्ठवाची एक जत्राच. यामध्ये भारताचे एकमेव पद्मश्री पुरस्कार विजेते माजी शरीरसौष्ठवपटू प्रेमचंद डेगरा यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय शरीरसौष्ठवपटू महासंघाने अखिल भारतीय स्पर्धेचे आयोजनही केले होते. या वेळी त्यांनी ‘बॉडी एक्स्पो’चे फायदे, जगामध्ये भारतीय शरीरसौष्ठवपटूंचे स्थान, उत्तेजकांचा बीमोड, जागतिक शरीरसौष्ठव लीग, यासंदर्भात आपली मते व्यक्त केली. लीग खेळवण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. या लीगमुळे खेळ आणि खेळाडूंचा दर्जा उंचावेल. खेळाडूंसाठी हे फार मोठे व्यासपीठ असेल, असे डेगरा यांनी या वेळी सांगितले.

Chess Candidates 2024, World Championship contender, D Gukesh, Gukesh
अनुभवात कमी, रँकिंगमध्ये खाली…तरीही कँडिडेट्स स्पर्धेत गुकेश कसा ठरला विजयी? आनंदप्रमाणे जगज्जेता बनण्याची शक्यता किती?
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
  • बॉडी एक्स्पोचा किती फायदा शरीसौष्ठव खेळाला होईल?

‘बॉडी एक्स्पो’ पाहायला जे कुणी आपले शरीर सुदृढ बनवू इच्छितात, ते सारे येत असतात. या ‘बॉडी एक्स्पो’मध्ये त्यांना नेमके काय करायला हवे, याचे मार्गदर्शन आणि उपाय मिळत असतात. त्याचबरोबर ज्यांना शरीरसौष्ठव खेळाबद्दल प्रेम, आदर आहे, त्या व्यक्ती या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतात. त्यामुळे विचारांची देवाण-घेवाण होते आणि या खेळाला अधिक चालना मिळायला मदत होते. हे सारे आमच्या वेळेला नव्हते, नाही तर या गोष्टींचा आम्हाला फार मोठा फायदा झाला असता.

  • शरीरसौष्ठव म्हणजे उत्तेजकांचा खेळ, अशी काळिमा काही जण फासत असतात, याबद्दल तुम्हाला काय वाटते?

मुळात ही समजूतच चुकीची आहे. कारण शरीरसौष्ठवपटू होण्यासाठी उत्तेजकांची काहीच गरज नसते, यासाठी जिद्द आणि अथक मेहनत तुमच्याकडे असायला हवी. जे काही नैसर्गिकरीत्या तुम्हाला सेवन करायला मिळते, त्याच्यावर तुम्ही जोर दिलात तर तुमचे सौष्ठव अधिक खुलून येते. आम्ही संघटनेच्या माध्यमताून या गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. या खेळात उत्तेजक कदापि येऊ नयेत, हीच आमची धारणा आहे. उत्तेजकांचा बीमोड करण्यासाठी आम्ही कडक पावले उचलत आहोत. खेळाडूंची कधीही उत्तेजक सेवन चाचणी घेतली जाते आणि त्यामध्ये जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे.

  • शरीरसौष्ठव विश्वामध्ये भारताचे स्थान काय आहे, असे तुम्हाला वाटते?

गेल्या महिन्यांत जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा झाली, त्यामध्ये भारतीय खेळाडूंची लक्षणीय कामगिरी पाहायला मिळाली. पुरुष आणि महिला दोन्ही गटांमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. यापुढेही त्यांच्याकडून अधिक चांगल्या कामगिरीची आम्हाला आशा आहे.

  • भारताला इराण आणि अन्य काही देशांकडून कडवी झुंज मिळते, त्यांच्यावर मात करण्यासाठी आपल्या देशातील शरीरसौष्ठवपटूंनी काय करायला हवे?

माझ्य मते मेहनतीला पर्याय नाही. जर तुम्हाला अव्वल क्रमांकावर पोहोचायचे असेल, तर तो ध्यास तुमच्या मनात असायला हवा आणि हा ध्यास पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वत:ला झोकून द्यायला हवे. शरीरसौष्ठवपटूंच्या शरीरामध्ये बदल होत असतात. पण अधिक पीळदार शरीरयष्टी कायम ठेवण्यासाठी तुम्ही अथक मेहनत घ्यायला हवी. याची दुसरी बाजू म्हणजे या खेळाडूंना कशी अधिक आर्थिक मदत करता येईल, याचाही आम्ही विचार करत आहोत. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत आम्ही खेळाडूंना जास्त रोख पारितोषिके देत आहोत, याचा फायदा त्यांना नक्कीच होईल.

  • जागतिक शरीरसौष्ठव लीग खेळवण्याचा प्रस्ताव तुमच्याकडे आहे, त्याबद्दल काय सांगाल?

हा प्रस्ताव आमच्याकडे असून तो विचाराधीन आहेत. कारण लीग खेळवणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी बऱ्याच परवानग्या घ्याव्या लागतात, त्यासाठी सध्याच्या घडीला आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरात लवकर तुम्हाला जागतिक लीग पाहायला मिळेल, अशी आशा करतो.

  • या लीगचा खेळ आणि खेळाडूंना किती फायदा होईल?

ही लीग सुरू झाली की, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळाडूंना फार मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल. या व्यासपीठाच्या माध्यमातून ते स्वत:ला सिद्ध करू शकतील. त्याचबरोबर या लीगमुळे खेळ अधिक सकस होईल. कारण लीगमुळे स्पर्धा फार वाढेल. आंतरराष्ट्रीय आणि आपल्या देशातले खेळाडू एकत्र येतील, त्यांच्यामध्ये खेळाबाबतची देवाण-घेवाण होईल. खेळातील काही तांत्रिक गोष्टी समजून घेतल्या जातील. एकंदरीत ही लीग खेळ आणि खेळाडूंना फार मोठय़ा उंचीवर घेऊन जाईल, एवढे मात्र नक्की.