News Flash

मोठय़ा यशाची अजूनही प्रतीक्षा

आठवडय़ाची मुलाखत : संजीव रजपूत, आंतरराष्ट्रीय नेमबाज

मोठय़ा यशाची अजूनही प्रतीक्षा

आठवडय़ाची मुलाखत : संजीव रजपूत, आंतरराष्ट्रीय नेमबाज

जागतिक नेमबाजी स्पर्धेतील ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारामध्ये पदक मिळवण्याचे स्वप्न मी साकार केले असले, तरी मला अद्याप मोठय़ा यशाची अपेक्षा आहे, असा आशावाद भारताचा अर्जुन पुरस्कार विजेता नेमबाज संजीव रजपूतने प्रकट केला. संजीवने बाकू (अझरबैजान) येथे नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता पूर्ण करण्यात त्याला अपयश आले, तरी पुढच्या ऑलिम्पिकसाठी तो आतापासूनच तयारी करीत आहे. नेमबाजीमधील आजपर्यंतची कारकीर्द व देशातील या खेळाच्या प्रगतीबाबत संजीवने केलेली खास बातचीत-

  • जागतिक स्पर्धेतील पहिल्या पदकाविषयी काय सांगशील?

या स्पर्धेत अनेक नामवंत खेळाडू सहभागी होत असतात. यंदाच्या ऑलिम्पिकची संधी हुकल्याची खंत मला वाटत होती. १०० टक्के तंदुरुस्तीच्या अभावी मी पात्रता स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करू शकलो नव्हतो. त्यामुळे निदान जागतिक स्पर्धेत पदक मिळवण्याच्या जिद्दीने मी सहभागी झालो होतो. या स्पर्धेतील प्राथमिक फेरीत मला सातवे स्थान मिळाले होते. मात्र अंतिम फेरीत मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी रुपेरी यशापर्यंत पोहोचू शकलो. पाच वर्षे मी जागतिक स्पर्धेत भाग घेत आहे. हे पहिलेच पदक असल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.

  • ऑलिम्पिक स्पर्धा हुकल्यानंतर नैराश्य आले होते काय?

रिओ येथील ऑलिम्पिकची संधी हुकल्यानंतर सुरुवातीला निराश झालो होतो. मात्र या खेळात भरपूर वर्षे कारकीर्द करता येते. लंडन येथे २०१२मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मी देशाचे प्रतिनिधित्व केले होते. साहजिकच अजूनही आपल्याला संधी साधता येईल असे मनाशी ठरवत मी पुन्हा सरावावर लक्ष केंद्रित केले आहे.

  • नेमबाजी अकादमीत प्रशिक्षकाच्या नोकरीबाबत समाधानी आहेस काय?

नवी दिल्ली येथील नेमबाजी अकादमीत प्रशिक्षक म्हणून मला नोकरी देण्यात आली आहे. नौदलात असताना तेथे सरावासाठी फारसा वेळ मिळत नसे. दिल्लीत सरावाला मिळत असला तरी पोलीस दलात वरिष्ठ पदावर नोकरी मिळवण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. कारण तेथे नेमबाजांना आणखी चांगल्या सुविधा व सवलती मिळत असतात. अर्थात प्रशिक्षकाचे कामही खूप महत्त्वाचे आहे. अन्य खेळाडूंना शिकवताना माझाही सराव होत असतो. त्यांच्याकडूनही मला खूप काही शिकायला मिळत असते.

  • नेमबाजीसाठी आपल्या देशात असलेल्या सुविधांविषयी तुझे काय मत आहे?

नेमबाजीने गेल्या सात-आठ वर्षांमध्ये आपल्या देशात खूप प्रगती केली आहे, यात तिळमात्र शंका नाही. सहभागी होणाऱ्या खेळाडूंमध्ये संख्यात्मक व गुणात्मक वाढत होत आहे. मात्र क्रिकेट, फुटबॉल आदी खेळांप्रमाणे या खेळाचा आणखी प्रसार होण्याची आवश्यकता आहे. अनेक खेळाडूंना सरावासाठी खूप लांबच्या ठिकाणी जावे लागते. प्रत्येक राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे संकुल निर्माण करण्याची आवश्यकता आहे. खेळाडूंना या सुविधांचा लाभ माफक दरात मिळवून देण्याची गरज आहे.

  • परदेशी प्रशिक्षकांचा किती फायदा होतो?

भारतीय नेमबाजांना ऑलिम्पिकमध्ये आजपर्यंत जी पदके मिळाली आहेत, त्यामध्ये परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. परदेशी प्रशिक्षकांकडे बदलत्या तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती असते. नेमबाजीतील प्रशिक्षक सर्वतोपरी मार्गदर्शन करतात.

  • संघटना स्तरावरील कार्याविषयी काय मत आहे?

भारतीय नेमबाजी संघटनेकडून सर्वच खेळाडूंना भरपूर मदत मिळत असते. नेमबाजीचे साहित्य आयात करताना त्यांच्याकडून तत्परतेने सहकार्य मिळते. पुढील वर्षी जागतिक चषक मालिकेतील एका स्पर्धेबरोबरच अंतिम फेरी आयोजित करण्याची संधी भारताला मिळाली आहे. ही आपल्या राष्ट्रीय संघटनेने केलेल्या कामगिरीचीच पावती आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2016 3:26 am

Web Title: loksatta sport interview with sanjeev rajput
Next Stories
1 Icc: पायचीतचा नवा निर्णय; आयसीसीची मंजुरी
2 ..आणि जर्मनी विजयी!
3 परत ये, परत ये!
Just Now!
X