तमाम महाराष्ट्रातील कबड्डी, खोखो, मलखांबपटूंनो! चला, उठा, लागा तयारीला! मराठी मातीतील या उपेक्षित भारतीय खेळांनी सीमोल्लंघन करावं, ही तुमची-आमची मनोमनीची इच्छा. ती साकार करण्यास महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समितीने केव्हापासून हिरवा कंदील दाखवलेला आहे. त्यासाठी गरज आहे, ती गेल्या पंधराशे दिवसांतील अनाकलनीय मरगळ झटकून टाकण्याची. क्रीडामंत्र्यांनी व क्रीडा-संघटनांनी कुंभकर्णाला लाजवणाऱ्या सुस्तीतून जागे होण्याची!
महाराष्ट्र राज्यासाठी सांस्कृतिक धोरण ठरवण्याकरता तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी २००९मध्ये एक खास समिती नेमली होती. भाषा आणि साहित्य, प्राच्यविद्या, कला (प्रयोगात्मक, दृश्यात्मक व चित्रपट), स्मारके व पुरस्कार, महिलाविषयक दृष्टिकोन यांसह क्रीडासंस्कृतीचीही धोरणात्मक रूपरेषा आखली. त्या धोरणात कबड्डी, खोखो, मलखांब, आटय़ापाटय़ा व मातीतील कुस्ती या खेळांचा ‘अन्य देशात प्रकार-प्रचार नियमितपणे करण्याची योजना सरकार आखेल,’ असे स्पष्ट प्रतिपादन केले होते.
सांस्कृतिक धोरण समितीला, आपला मसुदा तयार करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत महाराष्ट्र राज्य शासनाने दिली होती. समितीने सदस्य-सचिव अजय अंबेकर व अध्यक्ष आ. ह. साळुंखे यांचा कामाचा सपाटा असा की, ती मुदत संपण्याआधीच प्रदीर्घ चर्चा विचारमंथनातून हा मसुदा शासनापुढे ठेवला गेला. त्यास शासनाची संमतीही मिळाली.
सुमारे दहा-बारा बैठकांच्या प्रदीर्घ चर्चामध्ये सहभागी झाले होते, विविध विषयातील तज्ज्ञ-सदस्य आणि विषयानुसार आमंत्रित तज्ज्ञ. अध्यक्ष व विचारवंत साळुंखे यांसह दत्ता भगत, शफाअत खान, अशोक नायगावकर, डॉ. सिसिलिया काव्‍‌र्हालो, उल्हास पवार, गिरीश गांधी, डॉ. अरुण टिकेकर, वि. वि. करमरकर व सचिव अजय आंबेकर यांच्या सहभागामुळे क्रीडा-विषयक धोरणाचा तपशील विविध बाजूंनी अभ्यासला गेला. क्रीडाविषयक बैठकीत शासनातर्फे तेव्हाचे क्रीडा संचालक वैद्य आणि तज्ज्ञ म्हणून एशियाडमधील पदक विजेते रमेश तावडे आदी निमंत्रितांचे योगदान मिळवले गेले.
आग्रह नैसर्गिक मैदानाचा
जानेवारी २०१०मध्ये सांस्कृतिक धोरण समितीने केलेला हा मसुदा सांगतो-
‘कबड्डी, खोखो, मातीतील कुस्ती, मलखांब, आटय़ापाटय़ा असे बिनसाधनांचे किंवा अल्प साधनांचे खेळ, हे महाराष्ट्रीय व भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. या भारतीय खेळांचा अन्य देशात प्रसार आणि प्रचार नियमितपणे करण्याची योजना शासन आखेल. हे खेळ विशेषत: नैसर्गिक मैदानावर खेळवले जाण्याचा आग्रह धरेल.’
बेळगाव-कारवार आणि गोवा यांखेरीज संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली कामगारदिनी, १ मे १९६०ला. महाराष्ट्र निर्मितीच्या सुवर्ण जयंती महोत्सवात नवे सांस्कृतिक धोरण सरकारमान्य झाले. कबड्डी, खो-खो, मलखांब आदी देशी खेळांच्या आंतरराष्ट्रीय प्रसार-प्रचार योजनेस अधिकृत सरकारी पाठबळ लाभले. माननीय क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी अशी कोणतीही योजना आखण्याचा विचारच केला नाही! आपण ज्या सरकारचे, मंत्रिमंडळाचे एक घटक आहोत, त्या मंत्रिमंडळाने संमत केलेल्या अहवालातील क्रीडाविषयक भाग त्यांनी कधी नजरेखाली घातला का? आणि मसुद्यातील, अहवालातील हे क्रीडाविषयक प्रकरण किती मोठे असावे? फार तर साडेतीनशे शब्द! पण देशी खेळांच्या पुरस्काराच्या दृष्टीने लाखमोलाचे नव्हे, तर अक्षरश: करोडोमोलाचे शब्द!
पण ही कुंभकर्णी सुस्ती सर्वप्रथम क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांची, पण केवळ त्यांची एकटय़ाची नव्हे. त्यांच्या पुढारीपणाखालील क्रीडा खात्याची. तितकीच कबड्डी, खोखो, मलखांब संघटनेतील आजी-माजी संघटकांची. महाराष्ट्राच्या अस्मितेचा डंका पिटणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची आम्हा पत्रकारांसह मराठी समाजाची.
चला कामाला लागा! गेल्या पंधराशे दिवसातील उदासिनतेची चर्चा तूर्त बाजूस ठेवूया. आता पूर्णपणे प्राधान्य दिलं जावं, योजना -आखणीला कबड्डी, खोखो व मलखांब संघटकांनी स्वतंत्रपणे विचार करावा. आणि वास्तववादी, तपशीलवार योजना आखाव्यात या साऱ्या गोष्टी फार फार तर आठवडाभरात व्हाव्यात आणि विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागण्याआधी तिच्यावर सरकारी शिक्कामोर्तब झालेलं असावं.
कबड्डी, खोखो, मलखांब हे विकासाच्या वेगवेगळ्या अवस्थेत आहेत. कबड्डी संघटन पाकिस्तान, बांगलादेश, मलेशिया व थायलंड यांच्यापर्यंत पोचले आहे. श्रीलंका, नेपाळ, इराण, जपान, दक्षिण कोरिया यातही कबड्डीने चंचुप्रवेश केला आहे. चीनमध्ये कबड्डीचे स्थान नाममात्र असावं. आशियातील ४५ देशांपैकी ३०-३५ देशांत कबड्डीचा सूर अजून घुमायचा आहे.
खो-खोची बाब वेगळी. भरत खंडातील शेजारी देशांत पाकिस्तान, श्रीलंका-बांगलादेश-नेपाळ देशांत या खेळाने मूळ धरलेले नाही. असे देश आणि थायलंड-मलेशिया येथून प्रचारास सुरुवात व्हावी. थायलंडमध्ये गेली काही वर्षे राष्ट्रीय कबड्डी-प्रशिक्षक म्हणून स्थिरावलेले रमेश भेंडिगिरी यांची मदत घेता येईल. मलेशियात तामीळ वस्ती किमान सात टक्के असावी. त्यासाठी बंगळुरूच्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रातील नटराजन यांचा समावेश प्रसार पथकात करता येईल.
मुख्य म्हणजे या दौऱ्यांना प्रचार दौऱ्याची अवकळा येणार नाही, यासाठी संघटकांनी जागृत राहिले पाहिजे. दौऱ्याआधी सुमारे महिनाभर दोन डोळस व्यक्तींचे पाहणी पथक, संबंधित देशात पाठवलेच पाहिजे. प्रदर्शनीय सामने कोणत्या मैदानात वा स्टेडियममध्ये होणार, तेथील प्रसिद्धीची आणि राहाण्या-जेवणाची, वैद्यकीय मदतीची व्यवस्था त्यांनी तपासली पाहिजे. पाहणी पथकासह खो-खोतील रंगतदार सामन्यांची कॅसेटही तिथे दाखवली पाहिजे. तर चला आता संघटकांनो, क्रीडामंत्री महाशयांनो, आता तरी कामाला लागा! पंधराशे दिवसांतील कुंभकर्णी सुस्तीची भरपाई करा! (क्रमश:)