राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

आगामी राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत महाराष्ट्राकडून खेळण्यासाठी सिद्धार्थ देसाईने भारतीय रेल्वेची नोकरी सोडली आहे. परंतु त्याच्या महाराष्ट्राकडून खेळण्याच्या आशा आता रेल्वेच्या ‘ना-हरकत’ प्रमाणपत्रावर अवलंबून आहेत. संघाची नावे भारतीय हौशी कबड्डी महासंघाला पाठवण्याची मुदत २४ जानेवारीला संपत असून, सिद्धार्थसाठी महाराष्ट्राची संघनिवड करण्यास दिरंगाई होत आहे.

प्रो कबड्डी लीग गाजवणारा यू मुंबाचा चतुरस्र चढाईपटू सिद्धार्थने रेल्वेच्या संघात निवड झाल्यानंतर महाराष्ट्राकडून खेळण्यासाठी नागोठणे येथे सुरू असलेल्या विशेष शिबिराला हजेरी लावली. त्यानंतर तो नोकरी करीत असलेल्या दक्षिण-मध्य रेल्वेचा राजीनामा त्याने दिला. मात्र त्याचा रेल्वेशी असलेला पाच वर्षांचा करार खंडित करण्यासाठी भरावी लागणारी रक्कम आणि अन्य प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी काही अवधी लागणार आहे. त्यामुळे रेल्वेचे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र मिळणे आव्हानात्मक ठरणार आहे.

दरम्यान, रेल्वेकडून प्रशासक गर्ग यांना या प्रकरणाची माहिती देणारे पत्र देण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर राज्य कबड्डी संघटनेकडूनही प्रशासकांना पत्र पाठवून सिद्धार्थला २८ जानेवारीपासून सुरू होणारी राष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची अंतिम १२ जणांची संघनिवड लांबणीवर पडली आहे. आता या कालावधीत सिद्धार्थचा प्रश्न सुटला नाही, तर महाराष्ट्राला त्याच्या जागी अन्य खेळाडूला स्थान द्यावे लागणार आहे.