भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गेल्या आठवड्यात कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या या निर्णयाला कोहली आणि रवी शास्त्री यांच्याबरोबर झालेल्या वादाची किनार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर सोमवारी विराट कोहलीने पहिल्यांदाच याविषयीचे मौन सोडले. धोनीने अचानक  घेतलेल्या निर्णयामुळे आम्ही एकदम भूतकाळात रममाण झालो. धोनीने ज्यावेळी सिडनी कसोटीत पहिल्यांदा कसोटी संघाचा पुर्णवेळ कर्णधार म्हणून सूत्रे स्वीकारली त्या दिवसाची आठवण आम्हाला त्यावेळी झाली. धोनीच्या या निर्णयाबद्दल आम्हाला अजिबात कल्पना नव्हती, त्यामुळे आम्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
धोनीकडून शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. विशेषत: तणावाखाली खेळताना अतिशय शांत राहून योग्य वेळी निर्णय घेण्याचे त्याचे कौशल्य अफलातून असल्याचे विराटने सांगितले. या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. कोणत्याही कर्णधाराला त्या हव्याहव्याशा वाटतात. मीसुद्धा त्याच्यासारखा शांतचित्ताने खेळू शकेन अशी आशा करतो. मात्र, प्रत्येकाची शैली वेगळी असते, अशी पुस्तीही विराटने जोडली.
धोनी संघाला सतत सकारात्मक वृत्तीने खेळण्यासाठी प्रवृत्त करायचा. मात्र, सिडनी कसोटीत आम्हाला पाठिंबा देण्यासाठी तो मैदानावर नसेल. सकारात्मक दृष्टीने खेळण्याबरोबरच खेळाडुंनी स्वत:वर संयम ठेवला पाहिजे. मात्र, याचा अर्थ आम्ही आक्रमक खेळ करणार नाही, असा घेऊ नये. सिडनी कसोटीत भारतीय संघ सकारात्मक आणि आक्रमकरित्या खेळताना दिसेल.