उपांत्य फेरीत पॅरिस सेंट-जर्मेनवर ऐतिहासिक विजयाची नोंद

जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मँचेस्टर सिटीने मंगळवारी मध्यरात्री ऐतिहासिक विजयाची नोंद करताना प्रथमच चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या अंतिम फेरीत धडक मारली. रियाद महरेझने नोंदवलेल्या दोन गोलमुळे सिटीने उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात पॅरिस सेंट-जर्मेनवर २-० अशी मात केली.

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या सिटीने गेल्या आठवडय़ात झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील लढतीत सेंट-जर्मेनला २-१ असे नमवले होते. त्यामुळे एकूण ४-१ अशा गोलफरकासह त्यांनी अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. चॅम्पियन्स लीगमध्ये सलग सात सामने जिंकणारा सिटी हा इंग्लंडमधील पहिलाच संघ ठरला आहे. त्यांनी मँचेस्टर युनायटेड आणि आर्सेनल यांच्या सलग सहा विजयांच्या विक्रमाला मागे टाकले. आता २९ मे रोजी होणाऱ्या जेतेपदाच्या लढतीत सिटीसमोर रेयाल माद्रिद किंवा चेल्सी यांच्यापैकी एकाचे आव्हान असेल.

केव्हिन डीब्रुएनेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सिटीसाठी पॅरिसमध्येच जन्मलेल्या महरेझने अनुक्रमे ११व्या आणि ६३व्या मिनिटाला गोल केले. सिटीने यंदाच्या हंगामात लीग चषक स्पर्धेचे जेतेपद मिळवले असून प्रीमियर लीगमध्येही त्यांचे विजेतेपद जवळपास सुनिश्चित झाले आहे. त्यामुळे चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी जिंकून अजिंक्यपदाची हॅट्ट्रिक साकारण्याची सिटीकडे सुवर्णसंधी आहे.

दुसरीकडे स्नायूंच्या दुखापतीमुळे या लढतीला मुकलेल्या किलियान एम्बाप्पेच्या अनुपस्थितीचा फटका सेंट-जर्मेनला बसला. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरी गाठण्यात फ्रान्समधील सेंट-जर्मेन या संघाला अपयश आले.

गेल्या पाच वर्षांच्या मेहनतीचे फळ खऱ्या अर्थाने आता मिळाले आहे. आमचा प्रत्येक खेळाडू एखाद्या योद्धय़ाप्रमाणे खेळला. संपूर्ण स्पर्धेत अनेकदा पिछाडीवर असतानाही आम्ही सामना जिंकलो. त्यामुळे जेतेपद मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावू.

– पेप गॉर्डिओला,

मँचेस्टर सिटीचे प्रशिक्षक

१ पेप गॉर्डिओला यांच्या प्रशिक्षणाखाली सिटीने प्रथमच अंतिम फेरी गाठली. त्यांच्या मार्गदर्शनाखालील यापूर्वीच्या चार हंगामात त्यांना दरवेळी उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला.

२ रियाद महरेझ हा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीच्या दोन्ही लढतीत गोल करणारा दुसराच खेळाडू आहे.

११ चॅम्पियन्स लीगच्या एका हंगामात सर्वाधिक ११ सामने जिंकणारा मँचेस्टर सिटी हा पहिला इंग्लिश संघ ठरला आहे.

चॅम्पियन्स लीग फुटबॉल

प्रशिक्षक पेप गॉर्डिओला यांच्यासह जल्लोष करताना मँचेस्टर सिटीचे खेळाडू.