जोस मॉरिन्हो यांची टीका

व्यग्र वेळापत्रकामुळे मँचेस्टर युनायटेडचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आणि त्यामुळेच चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या पुढील मोसमात खेळण्याच्या क्लबच्या स्वप्नांचा चुराडा झाला. या अमानवी वेळापत्रकामुळेच क्लबची पिछेहाट झाली, अशी टीका युनायटेडचे प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांनी केली.

रविवारी इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पध्रेत वेन रुनीच्या विक्रमी १५०व्या गोलनंतरही युनायटेडला स्वानसी सिटीने १-१ असे बरोबरीत रोखले. या बरोबरीमुळे युनायटेडचे गुणतालिकेत अव्वल चौघांत स्थान पटकावण्याचे स्वप्नही भंगले. त्यात सामन्याअंती ल्युक शॉ आणि एरिक बैली या त्यांच्या खेहाडूंनाही दुखापतीने घेरले. त्यामुळे युरोपा लीगच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लीग सामन्यांत युनायटेड व मॉरिन्हो यांच्यासमोरील अडचणीत अधिक भर पडली आहे. याआधी बचावपटू ख्रिस स्मेलिंग व फिल जोन यांनाही दुखापतीमुळे बाकावर बसावे लागले आहे. त्यामुळे केल्टा व्हिगोविरुद्धच्या लढतीत प्रमुख सेंटर बॅक खेळाडूंशिवाय युनायटेडला स्पेनमध्ये खेळावे लागणार आहे.

‘‘दुखापतीबाबत मला कल्पना नाही. माझ्या मते ल्युकची दुखापत गंभीर आहे. त्याला दहा मिनिटांनंतर मैदान सोडावे लागले. फिल आणि ख्रिस यांच्या दुखापतीबाबत न बोलणे मी पसंत करीन. ते युरोपा लीग लढतीत खेळू शकतील, असे मला वाटत नाही. ज्युआन माटा दुखापतीतून सावरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ही आमच्यासाठी चांगली बातमी आहे,’’ असे मॉरिन्हो यांनी सांगितले.