इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल

मार्कस रॅशफोर्डचे दोन गोल तसेच अँथनी मार्शल आणि डॅनियल जेम्सने प्रत्येकी एक गोल करत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमिअर लीगच्या पहिल्याच सामन्यात बलाढय़ चेल्सीचा ४-० असा धुव्वा उडवला.

मँचेस्टर युनायटेडचे मुख्य प्रशिक्षक ओले गनर सोलस्कायर यांनी आरोन व्हॅन-बिसाका आणि हॅरी मॅगायर यांना पदार्पणाची संधी दिली होती. सुरुवातीपासूनच चेल्सीने चेंडूवर नियंत्रण राखले होते, पण १८व्या मिनिटाला चेल्सीचा बचावपटू कर्ट झौमा याने रॅशफोर्डला पाडल्यानंतर मँचेस्टर युनायटेडला पेनल्टी-किक बहाल करण्यात आली. रॅशफोर्डने कोणतीही चूक न करता युनायटेडचे खाते खोलले.

चेल्सीचे प्रशिक्षक फ्रँक लॅम्पार्ड यांनी ५८व्या मिनिटाला ख्रिस्तियन पुलिसिक याला पदार्पणाची संधी दिली. मैदानावर उतरताच शानदार कामगिरी करत त्याने फ्री-किक मिळवली. पण चेल्सीला बरोबरी साधता आली नाही. ६५व्या मिनिटाला मॅगायर याने चेंडूवर ताबा मिळवला.

जेसी लिंगार्डकडे चेंडू आल्यानंतर त्याने तो आंद्रेस परेराकडे सोपवला. अखेर मार्शलने चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. दोन मिनिटांनंतर रॅशफोर्डने बचावपटूंसह चेल्सीचा गोलरक्षक केपा अरिझाबालागा याला चकवून युनायटेडला ३-० असे आघाडीवर आणले. डॅनियल जेम्सने ८२व्या मिनिटाला चौथा गोल करत युनायटेडच्या विजयावर मोहोर उमटवली. सलामीच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवून यंदाच्या मोसमाची थाटात सुरुवात केल्याबद्दल सोलस्कायर यांनी आनंद व्यक्त केला.

सुरुवातीला खेळावर नियंत्रण मिळवल्यानंतर आम्ही खूप चुका केल्या. अखेरच्या क्षणीही चुकीचे निर्णय घेतल्याचा फटका आम्हाला बसला. या क्षणी चुका करणे आम्हाला परवडणार नाही, हा धडा शिकलो.

– फ्रँक लॅम्पार्ड, चेल्सीचे प्रशिक्षक