लुसान : भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पटकावणारा मनप्रीत हा भारताचा पहिला हॉकीपटू ठरला आहे.

भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देताना कर्णधार म्हणून मनप्रीतने मोलाची भूमिका बजावली होती. या पुरस्कारांच्या शर्यतीत असलेला बेल्जियमचा आर्थर व्ॉन डोरेन आणि अर्जेटिनाचा लुकास व्हिया यांच्यावर मनप्रीतने मात केली. व्ॉन डोरेनला दुसऱ्या तर व्हिया याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

मनप्रीतला एकूण ३५.२ टक्के मते मिळाली. त्यात राष्ट्रीय संघटना, प्रसारमाध्यमे, चाहते आणि खेळाडूंच्या मतांचा समावश आहे. व्हॅन डोरेनला १९.७ तर व्हियाला १६.५ टक्के मते मिळाली. या पुरस्कारासाठी बेल्जियमचा विक्टर वेगनेझ, ऑस्ट्रेलियाचे अरान झालेवस्की आणि ईडी ओकेनडेन यांना नामांकन मिळाले होते.

मनप्रीतने २०१२च्या लंडन आणि २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून त्याची कारकीर्द जोमाने सुरू आहे. त्याने आतापर्यंत २६० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या वर्षी मनप्रीतने एफआयएच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारताला विजय मिळवून देत टोक्यो ऑलिम्पिकचे स्थान मिळवून दिले होते.

पुरस्काराचे श्रेय सहकाऱ्यांना – मनप्रीत

मनप्रीत सिंगने या पुरस्काराचे श्रेय आपल्या सहकाऱ्यांना दिले आहे. ‘‘सहकाऱ्यांच्या मदतीशिवाय हा पुरस्कार मिळवणे अशक्य होते. हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद होत असून हा पुरस्कार मी सहकाऱ्यांना समर्पित करत आहे. त्याचबरोबर मला पाठिंबा देणारे शुभचिंतक, हॉकी चाहते आणि जगभरातून मला मत देणाऱ्या सर्वाचेच मी आभार मानत आहे,’’ असे मनप्रीतने सांगितले.

गेल्या वर्षीच्या भारतीय संघाच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, आम्ही जवळपास प्रत्येक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. एफआयएच सीरिज फायनल्स तसेच बेल्जियममधील हॉकी मालिका यासह सर्वच स्पर्धामध्ये आम्ही छाप पाडली आहे. २०१९ मध्ये ऑलिम्पिकचे स्थान निश्चित करण्याकडे आमचे लक्ष लागले होते.

– मनप्रीत सिंग,भारताचा हॉकी कर्णधार