हरयाणाच्या क्रीडामंत्र्यांची मागणी

युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याबद्दल मनू भाकरला हरयाणा सरकारकडून जाहीर झालेले २ कोटी रुपयांचे बक्षीस अद्याप मिळाले नसल्याच्या पार्श्वभूमीवर तिने ट्विटरवर जाहीरपणे हरयाणा सरकार आणि क्रीडामंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. त्या पार्श्वभूमीवर मनू भाकरने माफी मागावी, अशी मागणी हरयाणाचे क्रीडामंत्री अनिल विज यांनी केली आहे.

अर्जेटिनातील ब्यूनस आयर्स येथे झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाज मनू भाकरने सुवर्णपदक पटकावल्यानंतर तिला हरयाणा सरकारने २ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मात्र अद्याप त्या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे मनूने ट्विटरद्वारे विज यांच्या घोषणेचे छायाचित्र आणि बातमी टाकून ‘सर, ही घोषणा नक्की खरी आहे की केवळ घोषणाबाजी (जुमला) होती? हरयाणात कुणी तरी नक्कीच युवा ऑलिम्पिकच्या पुरस्कारांशीच खेळत आहे,’ अशा स्वरूपाचे विधान केले आहे.

‘‘मनूने सर्वप्रथम क्रीडा खात्याशी संपर्क साधून मग अशी जाहीर वक्तव्ये करायला हवी होती. राज्य शासनाच्या धोरणानुसार यंदाच्या क्रीडा स्पर्धेतील विजेत्याला पुढील वर्षी पुरस्काराची रक्कम दिली जाते. या शासनाने ऑगस्ट २०१८ मध्ये सर्व क्रीडापटूंना जाहीर केलेली बक्षिसाची रक्कम सुपूर्द केली आहे. हरयाणा सरकार हे खेळाडूंना देशभरातील अन्य राज्यांपेक्षा सर्वाधिक रकमेचे पुरस्कार देते. अशा परिस्थितीत सरकारची जाहीर निंदानालस्ती करणे योग्य नाही. नुकतीच ती आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहे. तिची कारकीर्द अजून बहरायची असून तिने तिच्या खेळावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे,’’ असे विज यांनी नमूद केले. ऑक्टोबर महिन्यात भाकरने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यावेळी  विज यांनी ‘‘पूर्वीचे सरकार विजेत्यांना फक्त १० लाख रुपयेच देत होते; पण विद्यमान हरयाणा सरकारने मनूला तिच्या कामगिरीबद्दल तब्बल २ कोटी रुपयांचे इनाम जाहीर केले आहे,’’ असे ट्वीटरवर म्हटले होते.