News Flash

मॅरेथॉन संयोजकांकडूनच नियमांची ऐशीतैशी

परदेशी खेळाडूंची फसवणूक

सणस मैदानावरील अ‍ॅथलेटिक्सच्या ट्रॅकवरच मॅरेथॉन शर्यतीकरिता बांबू रोवण्यात आले आहेत.

मैदानामुळेच आपण मोठे झालेलो असतो, त्या मैदानाचे रक्षण करणे ही आपली नैतिक जबाबदारी असते असे प्रत्येक खेळाडू व संघटक मानत असतो. मात्र पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यती आयोजित करणाऱ्या संघटकांकडूनच सणस मैदानावरील ट्रॅकवरच तंबू रोवून नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे.

नेहरू स्टेडियमवर होणाऱ्या क्रिकेट सामन्यांमुळे अ‍ॅथलेटिक्सचा सराव करणाऱ्यांसाठी व मैदानी स्पर्धा घेण्यासाठी सणस मैदानावरच कृत्रिम ट्रॅक बसविण्यात आला आहे. या ट्रॅकवर आशियाई निमंत्रित स्पर्धासहित अनेक मैदानी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या ट्रॅकवर दररोज साधारणपणे दोनशेहून अधिक खेळाडूही अ‍ॅथलेटिक्सचा सराव करीत असतात. त्यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे.

मॅरेथॉन शर्यतीची सांगता सणस मैदानावर होणार आहे. त्याकरिता ट्रॅक व स्टेडियमवरील काही खोल्यांकरिता सणस मैदान वापरण्याबाबत पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टने परवानगी घेतली आहे असे सणस मैदानाचे व्यवस्थापक बापू पवार यांनी सांगितले. मात्र ट्रॅकवर कोणतेही बांबू ठेवू नये किंवा तेथे पत्रे ठोकू नयेत असा सर्वसाधारण नियम आहे. किंबहुना ट्रॅकवर क्रीडा बुटांखेरीज अन्य कोणतीही पादत्राणे आणू नयेत असेही संकेत आहेत. तथापि मॅरेथॉन संयोजकांनी तेथील ट्रॅकवरच बांबू रोवले आहेत. त्यामुळे तेथे सराव करणाऱ्या अनेक खेळाडूंनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अ‍ॅथलेटिक्स संघटकांकडूनच असे अडथळे निर्माण केले जाणे ही शोकांतिका असल्याचे मत काही खेळाडूंनी व्यक्त केले.

परदेशी खेळाडूंची फसवणूक

मॅरेथॉन ट्रस्टचे सरचिटणीस प्रल्हाद सावंत यांनी परदेशी खेळाडूंना नोव्हेंबर २०१७ मध्ये पाठविलेल्या पत्रावर भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे सहसचिव असल्याचेही नमूद केले आहे. मात्र दोन वर्षांपूर्वीच त्यांना या पदावरून मुक्त करण्यात आले आहे असे एएफआयचे सरचिटणीस सी. के.वॉल्सन यांनी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीला सांगितले.

संयोजकांकडून खेळाडूंची दिशाभूल

शर्यतीकरिता तयार करण्यात आलेल्या नियमावली पुस्तकात या शर्यतीस भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ (एएफआय) व आंतरराष्ट्रीय हौशी अ‍ॅथलेटिक्स महासंघ (आयएएएफ) यांची परवानगी घेतली असल्याचे छापण्यात आले आहे. मात्र आपण त्यांना परवानगी दिली नसल्याचे पत्र एएफआयने ३० नोव्हेंबर रोजी सर्व अ‍ॅथलेटिक्स संघटनांना व खेळाडूंना पाठविले आहे. तसेच आयएएएफच्या परवानगीसाठी एएफआयमार्फत जावे लागते. एएफआयनेच शर्यतीकरिता परवानगी दिली नसल्यामुळे आयएएएफकडून परवानगी मिळणे अवघडच असते. त्याद्वारे मॅरेथॉन संयोजकांनी खेळाडूंची दिशाभूलच केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 1:50 am

Web Title: marathon competition rules
Next Stories
1 Video : मुरलीचे कोहलीच्या साथीने वेस्ट इंडिज स्टाईल सेलिब्रेशन
2 धवनला बाद करत फिरकीपटू परेराने गाठले विक्रमाचे शिखर
3 पदार्पणाच्या सामन्यातच ‘तो’ गोंधळला!
Just Now!
X