७२ बॉक्सर्सवर भारताची भिस्त; १६ देशांमधील २०० खेळाडूंचा सहभाग

इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेला सोमवारपासून गुवाहाटीत सुरुवात होणार असून सर्वाच्या नजरा सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या एम. सी. मेरी कोम हिच्या कामगिरीकडे लागल्या आहेत. ऑलिम्पिक पात्रतेच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची असल्याने मेरी कोमने सुवर्णपदक पटकावण्याचे ध्येय ठेवले आहे.

दुसऱ्या पर्वात भारताचे ७२ बॉक्सर्स आपले नशीब अजमावणार असून या स्पर्धेत १६ देशांमधील जवळपास २००पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहे. आशियाई स्पर्धेतील विजेता अमित पांघल तसेच जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता शिवा थापा हेसुद्धा या स्पर्धेत उतरणार आहेत. ऑलिम्पिक पात्रतेसाठीची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ७ ते २१ सप्टेंबरदरम्यान पुरुषांसाठी आणि महिलांसाठी ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान रशिया येथे रंगणार आहे. त्यामुळेच इंडिया खुल्या स्पर्धेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

मेरी कोमने जागतिक स्पर्धेच्या तयारीसाठी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली होती. ‘‘माझ्याकडून सर्वानाच खूप अपेक्षा आहेत. गेल्या काही महिन्यांपासून खडतर परिश्रम घेतल्यामुळे ५१ किलो वजनी गटात खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. माझ्या घरच्या ठिकाणी ही स्पर्धा होणार असल्यामुळे भारतीय खेळाडूंना येथील चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल,’’ असे मेरी कोमने सांगितले. गेल्या वर्षी मेरी कोमने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले होते.

अमित पांघल (५२ किलो), शिवा थापा (६० किलो) हे वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाले असून गौरव बिदुरी (५६ किलो) याच्याकडूनही भारताला पदकाची अपेक्षा आहे. ‘‘यावेळी पदकाचा रंग बदलण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. घरच्या चाहत्यांसमोर खेळण्यासाठी मी उत्सुक आहे,’’ असे शिवा थापाने सांगितले. महिलांमध्ये, भाग्यवती कचरी, मनीषा मौन (५७ किलो), सिमरनजीत कौर (६० किलो), पूजा राणी (७५ किलो) यांच्यावर भारताची भिस्त राहील.