आशियाई क्रीडा स्पर्धेतील फुटबॉलमध्ये मॅच-फिक्सिंग झाल्याचा आरोप सट्टेबाजी विश्लेषण करणाऱ्या कंपनीने केला आहे. स्वित्र्झलडस्थित ‘स्पोर्टरडार’ कंपनीने हा दावा केल्याचे वृत्त सिंगापूरच्या वृत्तपत्राने दिले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संयोजकांनी दिले आहे. कुठल्या सामन्यांविषयी साशंकता आहे, याविषयीचा तपशील मात्र जाहीर करण्यात आलेला नाही.
हिजाबवरून वाद
कतारच्या महिला बास्केटबॉलपटूंना हिजाब घालण्यास मनाई करण्याच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. हा आमच्या धर्माचा अपमान असल्याचे सांगत कतारच्या संघाने दुसऱ्या लढतीतूनही माघार घेतली. हिजाबवरील बंदीमुळे कतारचा संघ बास्केटबॉल स्पर्धाच अर्धवट सोडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उत्तेजक सेवन चाचणीत दोषी
कंबोडियाचा टेनिसपटू प्रतिबंधित उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्याने स्पर्धेला गालबोट लागले आहे. स्पर्धेदरम्यान उत्तेजक चाचणीत दोषी आढळणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.
चीनचा जलतरणपटू वादाच्या भोवऱ्यात
चीनचा प्रसिद्ध जलतरणपटू सन यांग आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जपानचे राष्ट्रगीत खराब असल्याचे आक्षेपार्ह उद्गार यांगने काढले होते. यांगच्या या उद्गारांविरोधात जपानच्या चमूने तक्रार दाखल केली. यापूर्वी विनापरवाना गाडी चालवताना बसला धडक दिल्याप्रकरणी यांगला पोलिसांनी सहा महिने तुरुंगात टाकले होते. प्रशिक्षकांशी त्याचे मतभेदही चांगलेच गाजले होते.