प्रशांत केणी

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्माची पाचही शतके चार वेगवेगळ्या खेळपट्टय़ांवर साकारलेली आहेत. या खेळींमधून त्याच्या फलंदाजीतील परिपक्वता अधोरेखित होते. हा परिपक्व रोहित अधिक धोकादायक ठरत आहे, असे मत त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी व्यक्त केले.

‘‘रोहितचे तंत्र अप्रतिम आहे. तो प्रत्येक चेंडूला फटके खेळत नाही, तर खराब चेंडूवर आक्रमण करतो. मी त्याला सुरुवातीची १० ते १२ षटके खेळपट्टीवर टिकाव धर आणि मग फटकेबाजी करीत मोठी खेळी साकार, असा सल्ला दिला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील आव्हानात्मक खेळपट्टीवर रोहितच्या शतकानंतर कर्णधार विराटनेसुद्धा त्याचे कौतुक केले,’’ अशा शब्दांत लाड यांनी रोहितच्या विश्वचषकामधील फलंदाजीचे विश्लेषण केले. रोहितच्या कामगिरीबाबत लाड यांच्याशी केलेली खास बातचीत-

* रोहितच्या विश्वचषकातील फलंदाजीबाबत तुम्ही काय सांगाल?

रोहित कारकीर्दीतील सर्वोत्तम लयीत आहे. त्याने स्वत:ला आता सिद्ध केले आहे. परिस्थितीनुसार संयम आणि आक्रमकता त्याला उत्तमरीत्या जोपासता येते.

* मी शतके किंवा विक्रमांसाठी क्रिकेट खेळत नाही. विश्वचषक जिंकणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे, असे रोहित म्हणतो. याबाबत तुमचे मत काय आहे?

रोहितची २०११च्या विश्वचषकाची संधी हुकली. मग २०१५च्या विश्वचषकात भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. त्यावेळी फक्त बांगलादेशविरुद्ध त्याने शतक नोंदवले. अन्य सामन्यांत त्याला मोठय़ा खेळी साकारता आल्या नव्हत्या. भारताला दोन विश्वविजेतेपद जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हा अखेरचा विश्वचषक आहे. रोहितच्या कारकीर्दीत धोनीचे फार महत्त्वाचे योगदान आहे. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत रोहितला सलामीला उतरण्याचा सल्ला धोनीनेच दिला होता. काही वर्षांपूर्वी रोहित धावांसाठी झगडत असताना धोनीच त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. ज्या पद्धतीने सचिनला भारतीय क्रिकेटने विश्वविजेतेपदाची भेट दिली, त्याप्रमाणेच धोनीला विश्वचषक विजयाची भेट देण्याची योजना भारतीय संघाची असू शकेल. याच प्रेरणेने रोहितची कामगिरी उंचावली आहे.

* २०११नंतर रोहितची कामगिरी कमालीची उंचावली. हा बदल त्याच्यात कसा घडला?

२०११च्या विश्वचषकासाठी रोहितची निवड न झाल्यामुळे तो डिवचला गेला होता. विश्वचषक स्पर्धेत खेळणे, हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते आणि या स्पर्धेसाठीच्या संघातून वगळल्याचे शल्य त्याला तीव्रतेने बोचू लागले. परंतु या परिस्थितीला तो स्वत:च जबाबदार होता, याची जाणीव त्याला झाली. २००९ ते २०११ या कालखंडात रोहित खेळासाठी पुरेसा वेळ देत नव्हता. विश्वचषक स्पर्धेच्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठीची कामगिरीसुद्धा त्याच्याकडून झाली नव्हती. त्यावेळी मी त्याची कानउघाडणी केली. आज तू जो काही आहेस, ते सारे तुला क्रिकेटने दिले आहे. तू जर आता गांभीर्याने क्रिकेटकडे पाहिले नाहीस, तर तू बाहेर फेकला जाशील, असा सल्ला त्याला दिला. त्यानंतर त्याने क्रिकेटकडे पूर्णत: लक्ष केंद्रित केले.

* इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्याचा फायदा रोहितला कशा प्रकारे झाला?

२०११नंतर रोहितने कात टाकली. मग मुंबई इंडियन्सने रोहितकडे नेतृत्वाची धुरासुद्धा सोपवली. त्यामुळे जबाबदारीची जाणीव त्याच्यात निर्माण झाली. मग त्याचा सकारात्मक परिणाम त्याच्या कामगिरीवर दिसून आला. २००७ ते २०११ या कालखंडात त्याच्या खात्यावर फक्त दोन शतके जमा होती. परंतु २०११ नंतर त्याने तब्बल २५ शतके नोंदवली आहेत.

* सचिनचे विक्रम हे भारतीय खेळाडूच मोडेल, असे काही वर्षांपूर्वी सुनील गावस्कर म्हणाले होते. आता सचिनचे दोन विक्रम रोहितच्या दृष्टिपथास आहेत. याविषयी काय सांगाल?

विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. माझे विक्रम भारताचे विराट आणि रोहित मोडू शकतील, असे सचिनने म्हटले होते. त्यामुळे सुनील आणि सचिन यांचे म्हणणे सत्यात अवतरेल.