बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाने धडाकेबाज पद्धतीने सुरुवात केली आहे. इंदूर कसोटीत भारताने बांगलादेशवर १ डाव आणि १३० धावांनी मात केली. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या १-० ने आघाडीवर आहे. मयांक अग्रवालचं द्विशतक आणि त्याला गोलंदाजांनी दिलेली साथ यामुळे भारतीय संघाचा विजय सुकर झाला.

अवश्य वाचा – तरुण वयात मी ज्या चुका केल्या त्या इतरांनी करु नये हीच माझी इच्छा !

मयांकने पहिल्या डावात ३३० चेंडूत २४३ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत २८ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. या खेळीसाठी त्याला सामनावीराचा किताबही देण्यात आला. या द्विशतकी खेळीदरम्यान मयांकने अनेक विक्रमही मोडले. बांगलादेशचा संघ पहिल्या आणि दुसऱ्या डावातही मयांकने एका डावात केलेल्या धावसंख्येची नोंद करु शकला नाही. मयांकने यादरम्यान सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या कामगिरीशी बरोबरी केली.

प्रतिस्पर्धी संघाच्या दोन्ही डावांतील धावसंख्येपेक्षा जास्त धावा करणारे भारतीय फलंदाज पुढीलप्रमाणे –

  • विनू मंकड (२३१ धावा) विरुद्ध न्यूझीलंड (२०९,२१९) चेन्नई १९५५-५६
  • राहुल द्रविड (२७० धावा) विरुद्ध पाकिस्तान (२२४,२४५) रावळपिंडी २००३-०४
  • सचिन तेंडुलकर (२४८ धावा) विरुद्ध बांगलादेश (१८४, २०२) ढाका २००४-०५
  • विराट कोहली (२१३ धावा) विरुद्ध श्रीलंका (२०५, १६६) नागपूर २०१७-१८
  • रोहित शर्मा (२१२ धावा) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (१६२, १३३) रांची २०१९-२०
  • मयांक अग्रवाल (२४३ धावा) विरुद्ध बांगलादेश (१५०, २१३) इंदूर २०१९-२०

या मालिकेतला दुसरा सामना २२ नोव्हेंबरला कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचा हा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.