हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पध्रेत बुधवारी ५४६ धावांची मॅरेथॉन खेळी साकारणाऱ्या रिझवी स्प्रिंगफिल्ड हायस्कूलच्या पृथ्वी शॉ या १५ वर्षीय क्रिकेटपटूवर शुभेच्छांचा ओघ गुरुवारी सुरू होता. आंतरशालेय क्रिकेट स्पध्रेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी पृथ्वीला हॅरिस आणि गाइल्स शिल्डची प्रतिकृती देण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई शालेय क्रीडा संघटनेचे (एमएसएसए) अध्यक्ष फादर ज्यूड रॉड्रिग्स यांनी दिली. याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गुरुवारी राष्ट्रवादी भवनात पृथ्वीचा विशेष सत्कार करण्यात आला.
‘‘हॅरिस आणि गाइल्स शिल्ड क्रिकेट स्पध्रेच्या इतिहासात कोणीही आजपर्यंत पाचशे धावा केल्या नव्हत्या. पृथ्वीने इतिहास घडवला आहे. त्यामुळेच त्याला चषकाची प्रतिकृती देऊन गौरवण्यात येणार आहे,’’ असे रॉड्रिग्स यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांनी पृथ्वी शॉला दिलेल्या अभिनंदनपर पत्रात म्हटले आहे की, ‘‘शालेय स्तरावर ५४६ धावांची विक्रमी खेळी केल्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन. विक्रमवीर सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीमुळे निराश झालेल्या क्रिकेटरसिकांना नवी आशा दाखवण्याचे काम तुझ्या खेळीने केले आहे. एमएसएसएतर्फे आयोजित होणाऱ्या हॅरिस शिल्ड स्पध्रेने अनेक गुणवंत खेळाडू देशाला दिले आहेत. तुझ्या विक्रमी खेळीने अनेक उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा मिळेल.’’