News Flash

शाहरुखपुढे एमसीएचे लोटांगण

वानखेडेवर गैरवर्तन आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक आणि बॉलीवूडमधील अभिनेता शाहरुख खानवरील पाच वर्षांची बंदी तीन वर्षांनंतरच उठवण्याचा निर्णय घेत मुंबई

| August 2, 2015 02:02 am

वानखेडेवर गैरवर्तन आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक आणि बॉलीवूडमधील अभिनेता शाहरुख खानवरील पाच वर्षांची बंदी तीन वर्षांनंतरच उठवण्याचा निर्णय घेत मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) त्याच्यापुढे लोटांगण घातल्याची भावना क्रिकेट विश्वात उमटली आहे. एमसीएचे उपाध्यक्ष आशिष शेलार यांनी याबाबतचा प्रस्ताव कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये मांडला आणि या प्रस्तावाला अध्यक्ष शरद पवार यांनी मान्यता दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुखने आपल्यावरील बंदी उठवावी अशी विनंती शरद पवार यांना केली होती. ती विनंती मान्य करत पवार यांनी त्याच्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. शाहरुखने आपल्या कृत्याचा कोणताही माफिनामा न पाठवताही त्याच्याबाबत झालेल्या निर्णयामुळे क्रिकेट जगतामध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एकिकडे शाहरुखची पाठराखण करत असतानाच त्यांनी आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आलेला डावखुरा फिरकीपटू अंकित चव्हाणला मात्र पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. रविवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आले.
आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामध्ये अंकितला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. पण दिल्ली न्यायालयाने सकृद्दर्शनी पुरावे नसल्याने त्याची निर्दोष मुक्तता केली होती. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या प्रकरणासाठी एका समितीची स्थापना केली होती. या समितीच्या निर्णयानुसार बीसीसीआयने अंकितसह एस. श्रीशांत आणि अजित चंडिला यांच्यावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली न्यायालयाच्या निर्णयानंतरही बीसीसीआय आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत असल्यामुळे एमसीएनेही अंकितला पाठिंबा न देण्याचे ठरवले आहे.
‘‘आज झालेल्या एमसीएच्या बैठकीमध्ये अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने आम्ही शाहरुखवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतचा प्रस्ताव मी कार्यकारिणी समितीपुढे केली होती आणि त्यांनीही ती मान्य केली,’’ असे शेलार यांनी सांगितले.
आयपीएलमधील कोलकाता आणि मुंबई इंडियन्स यांच्यामधील सामन्यानंतर शाहरुखने वानखेडेवर असभ्य वर्तन केले होते. नियमांचे उल्लंघन करत त्याने सुरक्षारक्षकाशी वाद घातला होता. त्यामुळे त्यामुळे त्याच्यावर १८ मे २०१२ साली पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी घेतला होता.
‘‘जेव्हा गरज होती तेव्हा एमसीएने त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. पण ही बंदी आणखी पुढे कायम ठेवण्याचा एमसीएच्या कार्यकारिणीचा मानस नाही. त्यामुळे एमसीएने त्याच्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे शेलार म्हणाले.
अंकित चव्हाणबाबत एमसीए बीसीसीआयकडे दाद मागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी एमसीएच्या अधिकाऱ्यांनी अंकितला आम्ही बीसीसीआयकडे दाद मागणार असल्याचे सांगितले होते.
‘‘अंकितची न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाली असली तरी बीसीसीआयने याबाबत आम्हाला संदेश पाठवला होता. त्यानुसार आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या निर्णयाविरोधात आम्ही काहीही करणार नाही. शिस्तपालन आणि लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या शिफारशीनुसार बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही अंकितची विनंती फेटाळून लावली आहे,’’ असे शेलार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 2:02 am

Web Title: mca lifts shah rukh khans wankhede stadium entry ban
टॅग : Mca,Shahrukh Khan
Next Stories
1 चेक प्रजासत्ताकविरुद्ध भारताला चमत्काराची आवश्यकता -भूपती
2 आता लक्ष्य ग्रँडमास्टर किताब
3 विशेष ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणवीर सैनीला सुवर्ण
Just Now!
X