सेस्क फॅब्रेगसने केलेल्या एकमेव गोलाच्य बळावर बार्सिलोना संघाने १० जणांसह खेळावे लागलेल्या सेल्टिक फुटबॉल क्लबवर १-० असा निसटता विजय मिळवला. या विजयामुळे बार्सिलोना ‘ह’ गटात सहा गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे. स्पॅनिश लीग विजेत्या बार्सिलोनाने पहिल्या सत्रावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. मात्र सेल्टिकचा गोलरक्षक फ्रेझर फ्रोस्टर याला चकवण्यात त्यांना अपयश आले. सेल्टिकचा कर्णधार स्कॉट ब्राऊन याने नेयमारला गोलक्षेत्रात चुकीच्या पद्धतीने पाडल्यामुळे त्याला पंचांनी लाल कार्ड दाखवले. ७६व्या मिनिटाला अ‍ॅलेक्सीस सांचेझच्या क्रॉसवर फॅब्रेगसने गोल केला. लिओनेल मेस्सी, जेवियर मॅस्कारेन्हो, जॉर्डी अल्बा आणि कार्लोस प्युयोल दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकले नाहीत.
गॅरेथ बॅले पुन्हा संघाबाहेर
माद्रिद : मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे या आठवडय़ात सलग दुसऱ्या सामन्यासाठी गॅरेथ बॅलेला रिअल माद्रिद संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत फुटबॉलपटू होण्याचा मान पटकावणारा बॅले दुखापतीमुळे कोपनहेगन फुटबॉल क्लबविरुद्ध बुधवारी रात्री होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. मंगळवारी तो सरावासाठीही उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र किती काळ बॅले संघाबाहेर राहणार आहे, हे अद्याप रिअल माद्रिद क्लबकडून स्पष्ट झालेले नाही.