वेस्ट इंडिजचे दिग्गज वेगवान गोलंदाज मायकल होल्डिंग हे त्यांच्या युगातील एक दमदार गोलंदाज होते. फलंदाजाचा कर्दनकाळ अशी त्यांची ओळख होती. त्यांनी नुकतेच त्यांना भावणारे सर्वकालीन सर्वोत्तम वेगवान गोलंदाज कोण याचे उत्तर दिले आहे. त्यांनी सर्वोत्तम असे चार वेगवान गोलंदाज निवडले आहेत. सध्या करोनाच्या तडाख्यामुळे सारं काही बंद आहे. त्यामुळे सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. या दरम्यान मायकल होल्डिंग यांनी स्कायस्पोर्ट्स पॉडकास्टमध्ये मुलाखत देताना चार गोलंदाजांची नावे सांगितली.

पाक क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांची भारताविषयी दर्पोक्ती, म्हणाले…

आपल्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत त्यांनी सर्वप्रथम त्यांचे सहकारी माल्कम मार्शल आणि अँडी रॉबर्ट्स यांची नावे घेतली. या दोघांविषयी बोलताना होल्डिंग म्हणाले, “माल्कमने कारकिर्दीची चांगली सुरूवात केली होती. जसाजसा काळ बदलत गेला, तसं त्याने वेगवान गोलंदाजीबद्दल बरंच काही शिकून घेतलं. त्याला फलंदाजांचा अंदाज फार पटकन आणि सहजपणे यायचा. दुसरीकडे मी अँडी रॉबर्ट्सकडून खूप शिकलो. तो बहुतांश वेळा माझा रूममेट होता. आम्ही दररोज क्रिकेटवर खूप चर्चा करायचो”, असे होल्डिंग म्हणाले.

Video : भारतीय महिला क्रिकेटपटूचा धमाकेदार डान्स पाहिलात का?

याशिवाय, त्यांनी ऑस्ट्रेलियाचे डेनिस लिली आणि दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन यांचा समावेश केला. “लिलीकडे लय, आक्रमकता आणि नियंत्रण होते. सुरुवातीला तो खूप वेगवान होता, पण पाठीच्या दुखापतीनंतर त्याला आपली शैली बदलावी लागली. स्टेनबद्दल तर माझे पूर्णपणे वेगळे मत आहे. मी बाकीच्या तिघांसोबत खेळलो, पण स्टेनला मी फक्त खेळताना पाहिले. तो त्याच्या काळचा उत्तम वेगवान गोलंदाज होता. त्याला खेळताना पाहण्यासाठी मी पैसे खर्च करून तिकिट घेऊन सामना बघायलाही जाऊ शकतो”, असे ते इतर दोघांबाबत बोलले.