निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभवावर बऱ्याचदा टीका होत होती. मात्र ‘जास्त खेळल्याने अधिक ज्ञान मिळते, हा गैरसमज आहे, असे मला वाटते’, असे सांगत प्रसाद यांनी टीकाकारांना सणसणीत चपराक लगावली आहे.

एका विशेष मुलाखतीत प्रसाद यांनी विविध मुद्दय़ांवर मोकळेपणाने चर्चा केली. अवघ्या सहा कसोटी सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या प्रसाद यांच्यावर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही टीकास्त्र सोडले होते. ‘‘निवड समितीत नियुक्ती करताना सदस्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे का, हा एकमेव निकष असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटव्यतिरिक्त आमच्याकडे ४७७ प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव आहे. तसेच आमच्या कार्यकाळात आम्ही २०० पेक्षा जास्त प्रथम श्रेणी सामने पाहिले आहेत. त्यामुळे संघात खेळाडूंची निवड करताना हा अनुभव पुरेसा नाही का,’’ असा सवाल प्रसाद यांनी केला आहे.

ते म्हणाले, ‘‘जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभव हा एकमेव निकष असता तर राजसिंग डुंगरपूर हे एकही सामना न खेळता निवड समितीचे अध्यक्ष कसे झाले असते? राजसिंग यांनीच सचिन तेंडुलकरसारखा हिरा शोधून काढला.’’