मोहम्मद कैफ हे नाव घेतल्यावर डोळ्यापुढे येते अप्रतिम अशी फिल्डिंग. कैफने आपल्या कारकिर्दीत फलंदाजीपैक्षाही फिल्डिंगच्या जोरावर अधिक नाव कमावलं. नॅटवेस्ट मालिकेतील अंतिम सामन्यात कैफ-युवराज जोडीने तडफदार खेळ करून सामना जिंकला होता. कैफची ती खेळी साऱ्यांच्या लक्षात आहे, पण फिल्डिंगमध्ये कैफ शेवटपर्यंत अव्वल होता. मैदानावर त्याने अनेक असे झेल टिपले जे सहसा अशक्य किंवा कठीण वाटतील. पण त्यापैकीच एका झेलाबद्दल त्याला १६ वर्षांनी माफी मागाविशी वाटली.

भारतीय संघ २००४ ला पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यात कराची येथील सामना अटीतटीचा झाला होता. भारताने पाकिस्तानला ३५० धावांचे आव्हान दिले होते. पाकिस्तान विजयापासून केवळ १० धावा दूर असताना कैफने एक अप्रतिम असा झेल टिपला होता. पण हा झेल पकडताना त्याच्याकडून अशी गोष्ट घडली की त्याला त्याबद्दल माफी मागावी लागली.

पाहा व्हिडीओ-

कैफने तो झेल पकडला तेव्हा सहकारी हेमांग बदानी हा देखील त्याच्याबरोबर झेल पकडण्याचा प्रयत्न करत होता. कैफने झेप घेत झेल घेताना कैफचा पाय बदानीला लागला आणि तो थोडा जखमी झाला. कैफने या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने हेमांग बदानीची माफी मागितली. “तरूण खेळाडूंच्या निर्भिडपणामुळे संघ अशक्य गोष्टीही साध्य करू शकतो. आणि बदानी भाई, माफ करा”, असे मजेशीर ट्विट करत त्याने बदानीची माफी मागितली. दरम्यान, हा सामना भारताने ५ धावांनी जिंकला होता.