सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या वन-डे सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयासोबत भारताने 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात तीन बळी घेतल्याने मोहम्मद शामीला सामनावीर ठरवण्यात आलं. मैदानात आपल्या गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित करणाऱ्या शमीने यावेळी फाडफाड इंग्लिश बोलत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

नेपियरमध्ये शमीने हिंदी भाषेत उत्तरं दिली होती. यावेळी विराटने त्यांचं इंग्रजीत भाषांतर केलं होतं. त्यामुळे सामनावीर म्हणून शमीचं नाव जाहीर होताच त्याच्यासोबत विराट कोहलीदेखील आला होता. पण मुलाखातकर्त्याच्या भूमिकेत असणाऱ्या न्यूझीलंडच्या माजी गोलंदाज सायमन डूलच्या प्रश्नावर शमीने विराटची मदत न घेताच इंग्लिशमध्ये उत्तर दिलं आणि सगळेच आश्चर्यचकित झाले.

मोहम्मद शमीने दिलेलं उत्तर ऐकून सायमन डूललाही कौतुक वाटलं. त्याने ‘यूअर इंग्लिश बहुत अच्छा’ अशा शब्दांत शमीचं कौतुक केलं. यावेळी विराटलाही आपलं हसू आवरलं नाही.

न्यूझीलंडने दिलेलं 244 धावांचं आव्हान भारताने सहज पूर्ण केलं. विराट आणि रोहित यांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयाची पायाभरणी केली. रोहितने 62 तर कोहलीने 60 धावा केल्या. यानंतर अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक या जोडीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

भारतीय गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. भारताकडून मोहम्मद शमीने 3 बळी घेतले, त्याला हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 2-2 आणि भुवनेश्वरने 1 बळी घेत चांगली साथ दिली. न्यूझीलंडच्या भूमीवर विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला तब्बल एका दशकाची वाट पहावी लागली. 2008-09 साली भारताने न्यूझीलंडमध्ये 3-1 च्या फरकाने वन-डे मालिका जिंकली होती.