बेंगळूरु : सोमवारीच मोठय़ा विजयाच्या दिशेने वाटचाल केलेल्या भारतीय ‘अ’ संघाने मंगळवारी त्यावर शिक्कामोर्तब केले. बेंगळूरु येथे रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचा एक डाव व ३० धावांनी धुव्वा उडवत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दोन्ही डावांत पाच व कारकीर्दीत पहिल्यांदाच मिळवलेले दहा बळी, सलामीवीर मयांक अगरवालचे द्विशतक आणि पृथ्वी शॉचे शतक हे भारताच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले.

सोमवारच्या ४ बाद ९९ धावांपुढे खेळताना आफ्रिकेच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. रजनीश गुरबानीने भारताला दिवसाचे पहिले यश मिळवून दिले. त्याने झुबेर हम्झाला ६३ धावांवर बाद केले. पहिल्या डावात शतकाच्या जवळ येऊन बाद होणारा रुडी सेकंडच्या नशिबी यंदाही दुर्दैवच लिहिले होते. २१४ चेंडूंत १५ चौकारांसह तो पुन्हा ९४ धावांवरच युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर पायचित झाला. तळाच्या शॉन बर्गनेही ५० धावा करत संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. पण प्रमुख फलंदाज आधीच तंबूत परतल्यामुळे त्याचा संघर्ष अपुरा पडला. त्यानंतर, सिराजने शेपटाला गुंडाळत भारताचा विजय पक्का केला.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका ‘अ’ (पहिला डाव) : ८८.३ षटकांत सर्वबाद २४६

भारत ‘अ’ (पहिला डाव) : १२९.४ षटकांत ८ बाद ५८४ (डाव घोषित)

दक्षिण आफ्रिका ‘अ’ (दुसरा डाव) : १२८.५ षटकांत सर्वबाद ३०८ (रुडी सेकंड ९४, झुबेर हम्झा ६३; मोहम्मद सिराज ५/७३, रजनीश गुरबानी २/४५).