करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून भारतात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं. मध्यंतरीच्या काळात सरकारने परिस्थितीचा अंदाज घेत काही भागांमध्ये शिथीलता आणली होती, परंतू आजही अनेक राज्यांत लॉकडाउन कायम आहे. या परिस्थितीचा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे. अनेक खेळाडूंना या काळात सराव सोडून घर चालवण्यासाठी अनेक छोटी-मोठी कामं करावी लागत आहेत. मोहन बागान फुटबॉल क्लबच्या ज्युनिअर अकादमीतल खेळणारा पश्चिम बंगालचा फुटबॉलपटू दीप बागवरही करोनामुळे बिकट परिस्थिती ओढावली आहे. फुटबॉल स्पर्धा आणि अकादमी बंद असल्यामुळे दीपला आपल्या परिवाराला हातभार लावण्यासाठी रस्त्यावर भाजी विकण्याची वेळ आली आहे.

२० वर्षीय दीप बाग हा पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील कोन्नानगर भागात राहतो. मोहन बागान कडून खेळत असताना दीपला १ हजार रुपयांचा भत्ता मिळायचा. आपल्या वडिलांच्या कमाईसोबत दीप कुटुंबाला हातभार लावत होता. परंतू लॉकडाउन काळात अकादमी बंद असल्यामुळे दीपला आपलं आवडीचं काम करता येत नाहीये. दीपचे वडील पश्चिम बंगालमध्ये रिक्षा चालवतात. काही दिवसांपूर्वी वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे घरात पैसे येणं बंद झालं, त्यामुळे दीपने रस्त्यावर भाजी विकण्याचं ठरवलं. आपल्या या निर्णयामुळे घरात दोनवेळचं जेवण मिळायला मदत होते असं दीपने indianexpress.com शी बोलताना सांगितलं.

मोहन बागान या फुटबॉल क्लबचे देशभरात मोठे चाहते आहेत. यापैकी काही चाहत्यांनी दीपला मदत करण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केलं आहे.

परंतू या खडतर काळातही दीप वेळ मिळेल तेव्हा संध्याकाळच्या वेळेत फुटबॉलचा सराव करतो. ही परिस्थिती संपल्यानंतर मी पुन्हा खेळायला सुरुवात करेन. I League किंवा इतर कोणत्याही प्रोफेशनल स्पर्धेसाठी मी यंदा प्रयत्न करणार आहे. फुटबॉल खेळणं हेच माझं सर्वात आवडतं काम असून ते माझं स्वप्न असल्याचं दीप म्हणाला.