लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो हे फुटबॉलच्या नभांगणातील आतापर्यंतचे सर्वोत्तम खेळाडू.. दोघांच्या कामगिरीबाबत जगातील कानाकोपऱ्यांमधील चाहत्यांना कायम उत्सुकता असते.. मानधन, लोकप्रियता, जाहिराती, सर्वाधिक गोल आणि जवळपास सर्वच बाबतीत हे दोघेही अग्रस्थानी.. क्लब फुटबॉलवर अधिराज्य गाजवणारे.. बलॉन डी’ऑर या जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्काराच्या शर्यतीत कायम अग्रेसर असलेले.. मेस्सीने चार तर रोनाल्डोने एक वेळा हा पुरस्कार पटकावलेला.. त्याशिवाय दोघांच्याही नावावर असंख्य पुरस्कार.. त्यामुळेच महान फुटबॉलपटूंच्या मांदियाळीत विराजमान झालेले.. रोनाल्डो हा अद्वितीय तर मेस्सी तेजस्वी. पण इतकी गुणवत्ता ठासून भरलेली असतानाही देशकर्तव्यासाठी खेळताना त्यांच्या पदरी अपयशच का? हा प्रश्न आता सर्वसामान्यांना भेडसावू लागला आहे. पेले, दिएगो मॅराडोना, झिनेदिन झिदान या दिग्गज फुटबॉलपटूंनी स्वत:च्या बळावर आपापल्या संघाला विश्वचषक जिंकून देत स्वत:ची महानता सिद्ध केली. मग क्लबतर्फे खेळताना गोलधमाका करणारे हे दोन अवलिया मात्र अपयशी कसे?
बार्सिलोनाच्या ‘ब’ संघातून लिओनेल मेस्सीला २००४मध्ये मुख्य संघात पदोन्नती मिळाल्यानंतर त्याच्या कारकिर्दीत यशाचे शिखर गाठले. बार्सिलोनाकडून खेळताना त्याने जवळपास २५० गोल लगावले आहेत. पण २००५मध्ये राष्ट्रीय संघात पदार्पण करणाऱ्या मेस्सीच्या नावावर अवघे ४० गोल जमा आहेत. यावरूनच क्लब फुटबॉलमध्ये मेस्सीच्या यशाचा आलेख किती उंच भराऱ्या घेतो, हे दिसून येते. त्याची खेळाची शैली आणि गोल करण्याची पद्धत यावरून मॅराडोनाचा वारसदार म्हणून मेस्सीकडे पाहिले जाते. मॅराडोनाने ‘हॅण्ड ऑफ गॉड’ गोलच्या आधारे का होईना, पण अर्जेटिनाला १९८६मध्ये विश्वचषक जिंकून दिला. पण मेस्सीकडून तशी अपेक्षा बाळगूनही अर्जेटिनाला विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न साकारता आलेले नाही. ‘मेस्सी’मॅनियामुळे बार्सिलोनाने ला लीगा (६ जेतेपदे), कोपा डेल रे (२), सुपरकोपा डे स्पेन (६), चॅम्पियन्स लीग (३), यूएफा सुपर चषक (२) आणि फिफा क्लब विश्वचषक (२) अशी संपदा मिळवली. पण फिफा विश्वचषकासारख्या स्पर्धेत खेळताना मेस्सी आतापर्यंत फोल ठरला आहे. २००६च्या विश्वचषक स्पर्धेत मेस्सीने एकमेव गोल करून फिफा विश्वचषकाच्या इतिहासातील सहावा युवा खेळाडू बनण्याचा मान मिळवला. पण २०१०च्या विश्वचषक स्पर्धेत कारकिर्दीत बहरात असलेला मेस्सी आणि प्रशिक्षक दिएगो मॅराडोना, असा मिलाफ असतानाही अर्जेटिनाला उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करता आला नाही, तो मेस्सीच्या ‘फ्लॉप-शो’मुळे. या स्पर्धेत मेस्सीला एकही गोल लगावता आला नाही. त्यामुळे मेस्सीच्या राष्ट्रकर्तव्याबाबतीत अनेक प्रश्न उपस्थित झाले. २०१४च्या विश्वचषक स्पर्धेत बोस्निया आणि हेझ्रेगोव्हिना या नवख्या संघाविरुद्ध मेस्सीने आतापर्यंतची सर्व कसर भरून काढण्याची आवश्यकता होती. पण त्याला फक्त एकाच गोलाची कमाई करता आली.
दुसरीकडे मँचेस्टर युनायटेड आणि रिअल माद्रिद या दोन क्लब्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपापल्या क्लबला यशोशिखरावर नेले. पण ‘वन मॅन आर्मी’ अशी ओळख असलेला रोनाल्डो आपल्या पोर्तुगाल राष्ट्रासाठी मात्र अद्याप काहीही करू शकला नाही. रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेडला इंग्लिश प्रीमिअर लीग (तीन जेतेपदे), एफए चषक (१), फुटबॉल लीग चषक (२), एफए कम्युनिटी शिल्ड (१), चॅम्पियन्स लीग (१), फिफा क्लब विश्वचषक (१) अशी जेतेपदे मिळवून दिली. त्याचबरोबर रिअल माद्रिदला ला लीगा (१), कोपा डेल रे (२), सुपरकोपा डे स्पेन (१) आणि चॅम्पियन्स लीगचे (१) जेतेपद पटकावून दिले. पण रोनाल्डोच्याही राष्ट्रसेवेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होते. २००६च्या फिफा विश्वचषकात पोर्तुगालने उपांत्य फेरीपर्यंत झेप घेतली. पण पोर्तुगालच्या या यशात रोनाल्डोचा वाटा होता, फक्त दोन गोलचा. २०१०मध्ये रोनाल्डो सपशेल अपयशी ठरल्यामुळे पोर्तुगालला उपांत्यपूर्व फेरीतही स्थान मिळवता आले नाही. फक्त उत्तर कोरियाविरुद्ध पोर्तुगालने ७-० असा विजय मिळवताना रोनाल्डोने एका गोलचे योगदान दिले होते. आता २०१४ विश्वचषकात जर्मनीविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोचा करिश्मा दिसला नाही.
ज्या खेळाडूंवर सर्वाधिक आशा संघाला असतात, तेच जर अपयशी ठरले तर काय करायचे, असा प्रश्न कदाचित अर्जेटिना आणि पोर्तुगालला पडत असावा. २०० दशलक्ष ब्राझीलवासीयांच्या अपेक्षांचे ओझे खांद्यावर झेलणारा नेयमार यशस्वी ठरला. रॉबिन व्हॅन पर्सी आणि आर्येन रॉबेन यांनी आपल्या देशाला गतविजेत्या स्पेनविरुद्ध अविस्मरणीय असा विजय मिळवून दिला. पण मेस्सी, रोनाल्डोचे काय? आता या ताऱ्यांची खरी अग्निपरीक्षा लागणार आहे. मेस्सी, रोनाल्डोला आता स्वत:च्या बळावरच इतिहास घडवावा लागणार आहे.