महाराष्ट्र प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचा चार वर्षांनंतर पुन्हा प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा १० ते १६ मार्च दरम्यान होणार असून आयपीएलमधील खेळाडू केदार जाधव याच्यावर सर्वाधिक पाच लाख २५ हजार रुपयांची बोली लावली आह़े
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘२००९ मध्ये राज्यस्तरावर ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती. सलग तीन वर्षे या स्पर्धेचे आयोजन केले. त्यानंतर काही संघांनी लीगमधून माघार घेतल्यामुळे ही स्पर्धा बंद पडली. त्या वेळच्या आठ संघांपैकी दहाड सेलर्स, केडन्स रायगड रॉयल्स व गार्डियन वॉरियर्स या तीन संघांनी या लीगमध्ये भाग घेण्याचे निश्चित केले आहे. त्यांना यापूर्वी असलेल्या खेळाडूंपैकी प्रत्येकी पाच खेळाडू कायम ठेवण्यास परवानगी देण्यात आली. उर्वरित खेळाडूंमधून एमसीए इलेव्हन हा चौथा संघ तयार करण्यात आला आहे. ही स्पर्धा अव्वल साखळी पद्धतीने होणार आहे.
केदारला सव्वा पाच लाख रुपयांची बोली लावून दहाड सेलर्सने विकत घेतले. अनुपम संकलेचा याला चार लाख १० हजार रुपयांच्या बोलीवर त्यांनीच विकत घेतले आहे. गार्डियन संघाने डॉमिनिक मुथ्थुस्वामी (४ लाख २५ हजार) व निखिल नाईक (४ लाख ८० हजार) या दोन अव्वल खेळाडूंना विकत घेतले. केडन्स संघाने प्रयाग भाटी (साडेतीन लाख) व अंकित बावणे (४ लाख १५ हजार) यांना खरेदी केले आहे.