भारताने नऊ वर्षांपूर्वी आयसीसी वन डे विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या फायनलमध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनीने षटकार खेचत भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले. या विजयामुळे भारताने पुन्हा एकदा २८ वर्षानंतर विश्वचषकावर नाव कोरले होते. पण या सामन्याच्या सुरूवातीला एक गोंधळ निर्माण करणारा प्रकार घडला होता.

काय घडला होता प्रकार?

सामन्याच्या नाणेफेकीसाठी धोनी आणि कुमार संगकारा हे दोन कर्णधार मैदानावर आले, तेव्हा नाणेफेकीसाठी न्यूझीलंडचे जेफ क्रोव्ह हे सामनाधिकारी म्हणून आणि रवि शास्त्री हे समालोचक म्हणून तेथे उपस्थित होते. जेव्हा नाणं हवेत उडवण्यात आलं, तेव्हा कुमार संगकाराने हेड्स असं सांगितलं. पण वानखेडे मैदानावरील प्रेक्षकांच्या आवाजामुळे क्रोव्ह यांना संगकाराचा आवाज ऐकूच गेला नाही. त्यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर धोनी आणि संगकारा यांनी चर्चा करून पुन्हा नाणेफेक करण्याचा निर्णय घेतला, त्यात संगकाराने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

संगकारा-धोनी यांच्यात काय झाली चर्चा?

फिरकीपटू अश्विन याच्याशी इन्स्टाग्राम लाईव्हवर माजी कर्णधार कुमार संगकारा बोलत होता. त्यावेळी त्याने सांगितले, “त्या दिवशी मैदानात खूप जास्त गोंगाट होता. प्रेक्षकसंख्यादेखील प्रचंड होती. टॉस उडवल्यानंतर धोनीला नीट काही समजलं नाही. त्याने मला विचारलं की तू टेल म्हणालास का? त्यावर मी म्हंटलं की मी हेड्स म्हंटलं आहे. सामनाधिकारी म्हणाले की संगकारा जिंकला, पण धोनीने नकार दर्शवला. त्यामुळे खूपच गोंधळ झाला. शेवटी धोनी म्हणाला की आपण पुन्हा टॉस उडवूया. माझं नशीब चांगलं होतं त्यामुळे दुसऱ्यांदापण मीच टॉस जिंकलो”, असा धमाल किस्सा संगकाराने सांगितला.