भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने फ्लोरिडात वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱया ट्वेन्टी-२० सामन्याला झालेल्या दिरंगाईबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे(आयसीसी) तक्रार नोंदवली आहे. धोनीसह भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) देखील फ्लोरिडामध्ये झालेल्या प्रकराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तांत्रिक बिघाडामुळे अमेरिकेच्या फ्लोरिडात आयोजित करण्यात आलेला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसरा ट्वेन्टी-२० सामना तब्बल तासभर उशीराने सुरू करण्यात आला होता. आयसीसीच्या नियमित वेळेत सुरू न झाल्याने आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे सांगत धोनीने आपली तक्रार दाखल केली आहे.

फ्लोरिडातील स्थानिक प्रोडक्शन हाऊस ‘सनसेट’ आणि ‘विने’ यांनी स्टार स्पोर्ट्स वाहिनीला फीड देण्यात दिरंगाई केली. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे फीड देण्यात उशीर झाल्याचे सनसेटकडून सांगण्यात आले होते. यासंपूर्ण प्रकारामुळे सामन्याला ५० मिनिटे उशीर झाला होता. धोनीच्या मतानुसार सामना आयसीसी अंतर्गत आयोजित करण्यात आला असल्याने नियमानुसार तो वेळेत सुरू होणे अपेक्षित होते. त्यासाठी सेटलाईट सिग्नलची वाट पाहणे गरजेचे नव्हते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीचा मुद्दा हा अगदी स्पष्ट आहे. जर सेटलाईट सिग्नल न मिळाल्याने सामना उशीरा सुरू करणे हे आयसीसीच्या नियमात बसत असेल, तर पैसे खर्च करून सामन्याचे तिकीट खरेदी केलेल्या स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षकांना दिरंगाईचा फटक बसला त्याचे काय?, असा सवाल धोनीने उपस्थित केला आहे. पुढील महिन्यात दुबईमध्ये आयसीसीची महत्त्वाची बैठक होणार असून, इतर महत्त्वाच्या विषयांसह फ्लोरिडातील दुसऱया सामन्यात झालेल्या दिरंगाईच्या विषयावर देखील चर्चा केली जाणार आहे.