क्रिकेट विश्वात हल्ली प्रत्येक सामन्यात नवनवे विक्रम रचले जातात, तर जुने विक्रम मोडले जातात. हल्ली ट्वेन्टी-२० क्रिकेटला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आहे. तीन तासांत झटपट क्रिकेटचा रोमांचक आनंद देणारा हा प्रकार घड्याळाच्या काट्यावर धावणाऱया लोकांना सर्वार्थाने आपलासा वाटू लागला. कसोटी आणि एकदिवसीय सामन्याचा आनंद घेण्यासाठी जवळपास पूर्ण दिवसच द्यावा लागतो. पण ट्वेन्टी-२० मध्ये केवळ तीन तासांचा वेळ खर्ची होतो आणि त्यात चुरशीच्या लढतीचा रोमांच पाहायला मिळतो. एकाच दगडात दोन उद्देश साध्य होत असल्याने क्रिकेट रसिकांचा ओढा ट्वेन्टी-२०कडे वाढला. भारतीय संघाने मात्र क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आपले वर्चस्व कायम राखले.

 

महेंद्रसिंग धोनीने भारताला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठून दिले, तर एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मध्ये संघ अनुक्रमे तिसऱया व दुसऱया स्थानावर आहे. धोनीच्या भरवशाच्या फलंदाजीने भारतीय संघाने अनेक सामने जिंकले आहेत. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या धोनीने क्रिकेटविश्वात एक फलंदाज म्हणून मॅच विनर अशी ओळख निर्माण केली. क्रमवारीत अनेकदा सहाव्या स्थानावर फलंदाजीला येऊनही धोनीने केव्हाच दबावाखाली फलंदाजी केली नाही.

ट्वेन्टी-२० करिअरमध्ये धोनीच्या नावावर तर एका अनोख्या विक्रमाची नोंद आहे. ट्वेन्टी-२० विश्वात गेल्या ११ वर्षात धोनी एकदाही शून्यावर बाद झालेला नाही. धोनी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये याआधी २००६ साली द.आफ्रिकेविरुद्ध शून्यावर बाद झाला होता. यानंतर धोनीने एकूण ६४ ट्वेन्टी-२० सामने खेळले आणि यात धोनी एकदाही शून्यावर बाद झालेला नाही. याशिवाय, ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये यष्टीरक्षण करताना धोनीने सर्वाधिक विकेट्स घेतल्याचाही पराक्रम केला आहे. धोनीने आजवर ६३ वेळा स्टम्पिंग केले आहे, यात ४१ झेल आणि २२ स्टम्पिंग्सचा समावेश आहे.