माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भारतीय संघात स्थान मिळण्याचं श्रेय हे सौरव गांगुलीला जातं. २००४ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी कोणता यष्टीरक्षक निवडायचा यावर निवडकर्ते विचार आणि चर्चा करत होते, तेव्हा गांगुलीने धोनीवर विश्वास दाखवला होता. गांगुलीच्या नेतृत्वात धोनीला पहिला ‘ब्रेक’ मिळाला. त्याला फलंदाजीत वरच्या फळीत संधी मिळाली आणि त्याने संधीचं सोनं केलं. पाकिस्तानविरुद्धच्या अवघ्या पाचव्या डावात त्याने १४८ धावा ठोकल्या आणि आपली निवड सार्थ ठरवली. त्यानंतर कालांतराने धोनी पाचव्या-सहाव्या क्रमांकावर खेळू लागला आणि ‘मॅच फिनिशर’ झाला. पण धोनीने वरच्या फळीतच फलंदाजी करायला हवी होती, असे मत सौरव गांगुलीने BCCI ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं.

भारताचा सलामीवीर मयंक अग्रवाल याने BCCI च्या ओपन द नेट्स या कार्यक्रमात गांगुलीची मुलाखत घेतली. त्यावेळी गांगुली बोलत होता. “धोनीची निवड करणं हे माझं काम होतं. चांगले खेळाडू निवडून आपला संघ सर्वोत्तम करणं हे प्रत्येक कर्णधाराचं कर्तव्य असतं. मी स्वत:च्या आतून आलेला आवाज ऐकला. मी स्वत:च्या अनुभवावर विश्वास ठेवला आणि मला आनंद आहे की टीम इंडियाला महेंद्रसिंग धोनी मिळाला. कारण तो खूपच अप्रतिम खेळाडू आहे. केवळ फिनिशरच नाही, तर तो जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे”, असं गांगुली म्हणाला.

“सारे जण धोनी हा एक उत्तम फिनिशर कसा आहे, हे सांगत असतात. पण मला आवर्जून सांगावंसं वाटतं की मी कर्णधार असताना धोनी तिसऱ्या क्रमांकावर खेळायचा. त्यावेळी त्याने विशाखापट्टणमच्या मैदानावर पाकिस्तानविरूद्ध १४८ धावा केल्या होत्या. मला नेहमी वाटायचं की त्याने वरच्या क्रमांकावर फलंदाजी करावी कारण तो खूप धडाकेबाज फलंदाज आहे”, असे गांगुलीने स्पष्ट केले.

दरम्यान, धोनीचा आज ३९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त गांगुलीने त्याला शुभेच्छादेखील दिल्या.