भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या संबंधी ट्विटरवर चार-पाच दिवसापूर्वी अचानक #Dhoni Retires असा एक हॅशटॅग ट्रेंड झाला. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले. या साऱ्या प्रकारावर धोनीची पत्नी साक्षी प्रचंड चिडली. तिने थेट आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रागाच्या भरात एक ट्विट केले. “या सगळ्या निव्वळ अफवा आहेत. लॉकडाउनमुळे सध्या काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. म्हणून असला हॅशटॅग ट्रेंड होतोय. अशा लोकांनी आपल्या स्वत:च्या आयुष्यात लक्ष घालावं”, असे साक्षीने ट्विट केले.

साक्षीने ते ट्विट काही वेळाने डिलीट करून टाकले. ते ट्विट डिलीट करण्यामागचे कारण तेव्हा कळू शकले नव्हते, पण नुकत्याच एका मुलाखतीत साक्षीने त्यामागचा विचार सांगितला. CSK च्या इन्स्टाग्रामवरून महिला अँकर रूपा रमाणी हिने साक्षीशी संवाद साधला. त्यावेळी साक्षीने त्या दिवशीचा प्रसंग सांगितला. “मला माझ्या एका मित्राने त्या हॅशटॅगबद्दल माहिती दिली. नक्की काय चाललंय? दुपारपासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा ट्विटरवर आहेत, असं मित्राने मला सांगितलं. मी ते ऐकून एकदम स्तब्ध झाले. मला कळत नव्हतं की काय करावं. मला माहिती नाही की मला काय झालं पण मी ते ट्विट करून टाकलं आणि थोड्या वेळाने डिलिट केलं. त्या ट्विटने त्याचं काम केलं होतं आणि जो संदेश मिळायला हवा तो टीकाकारांना मिळाला होता”, असे साक्षीने सांगितले.

विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचे आव्हान संपुष्टात आल्यापासून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. धोनीचे चाहते धोनीमध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक आहे. त्याने इतक्यात निवृत्त होऊ नये, अशी मतं व्यक्त करत आहेत. पण धोनी मात्र विश्वचषकानंतर अद्याप क्रिकेटच्या मैदानावर उतरलेला नाही. धोनीने विश्वचषक स्पर्धेनंतर दोन महिन्यांची विश्रांती घेतली होती. या कालावधीत त्याने काश्मीरमध्ये जाऊन भारतीय लष्कराला सेवा दिली.

नोव्हेंबरमध्ये धोनी मैदानात परतेल असे वाटत असतानाच त्याला पुन्हा एकदा विश्रांती दिल्याचे सांगण्यात आले. IPL 2020 मध्ये धोनी आपल्या खेळीचा जलवा दाखवेल आणि झोकात टीम इंडियात पुनरागमन करेल अशाही चर्चा रंगल्या. पण दुर्दैवाने करोनामुळे IPL पुढे ढकलण्यात आले. अशा परिस्थितीत धोनी मैदानावर परतण्याऐवजी निवृत्ती जाहीर करणार अशी चर्चा पुन्हा रंगू लागली होती.