यष्टींमागे उभ्या असणाऱ्या धोनीकडून डीआरएस अपीलच्यावेळी दाखविण्यात येणारा ‘सिक्स्थ सेन्स’ आमच्यासाठी अमूल्य असल्याचे मत, भारताच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाचा नवनिर्वाचित संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत तो बोलत होता. गेल्या काही वर्षांमध्ये कर्णधारपदी असताना धोनीने निर्णय घेताना दाखविलेली समयसूचकता पाहता धोनीचा शब्द हा माझ्यासाठी अंतिम आहे. मी काल धोनीने केलेल्या अपील्सच्या आकडेवारीवर नजर टाकली. त्यावेळी माझ्या लक्षात आले की, धोनीने त्याच्या कारकीर्दीत केलेली ९५ टक्के अपील्स यशस्वी ठरली आहेत. एखादा चेंडू रेषेबाहेर पडला आहे किंवा यष्टीच्या बाहेर जात आहे, हे एकदा धोनीने सांगितले की, त्याबाबत कोणतीही शंका घेतली जाऊ शकत नाही. जेव्हा कोणतेही अपील करायचा प्रश्न येतो तेव्हा धोनीने नेहमीच चाणाक्षपणा दाखवला आहे. त्याच्या शब्दावर मी एका पायावर विश्वास ठेवायला तयार आहे.
महेंद्रसिंग धोनीने त्याच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत नेहमीच डीआरएस तंत्रज्ञानाला विरोध दर्शवला होता.  मात्र, नुकत्याच होऊन गेलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्याविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने डीआरएसचा चांगला फायदा करून घेतला होता. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेतही डीआरएस तंत्राचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी भारत सज्ज आहे.

आयसीसीच्या तिनही मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व करणारा महेंद्रसिंग धोनी हा पहिलाच कर्णधार आहे. आपल्या कर्णधारी कारकिर्दीच्या पदार्पणातच धोनीने भारतीय संघासाठी पहिला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला. धोनीच्या नेतृत्त्वात संघाने कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान काबीज केले. धोनी भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. कर्णधारी गुणांसोबतच धोनी यष्टीरक्षणाच्याबाबती देखील तितकाच चपळ आणि कौशल्यपूर्ण आहे. धोनीच्या नावावर कसोटी विश्वात ३८ स्टम्पिंग, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९२, तर ट्वेन्टी-२० मध्ये २२ स्टम्पिंग जमा आहेत. धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने तब्बल २८ वर्षांनी विश्वचषक जिंकला. वानखेडे स्टेडियमवर २०११ सालच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेवर मात करून भारतीय संघाने विश्वचषक उंचावला होता. धोनीने आतापर्यंत ९११० धावा ठोकल्या असून १८३ ही त्याची सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आहे.