खेळ आणि खेळाडू यांचे नाते गहिरे असते. सार्वकालीन महान खेळाडू खेळालाच झळाळी मिळवून देतात. अफलातून खेळाच्या जोरावर बॉक्सिंगला वलय मिळवून देणारे महान बॉक्सिंगपटू मोहम्मद अली यांचे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.
श्वसनासंदर्भातील आजारपणामुळे अली यांना अ‍ॅरिझोना प्रांतातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दशकांहून अधिक काळ बॉक्सिंगद्वारे आपल्या झंझावाताची मोहर उमटवणाऱ्या अली यांनी शुक्रवारी शेवटचा श्वास घेतला. पार्किन्सनसारख्या दुर्धर आजाराशी अली यांचा ३२ वर्षांचा लढा संपुष्टात आला. अली यांच्या निधनाने खेळांपल्याड जाऊन सामाजिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन चळवळ उभारणारा कार्यकर्ताही हरपला आहे.
अद्भुत व थरारक खेळाद्वारे ‘द ग्रेटेस्ट’ हे बिरूद त्यांना मिळाले. उच्च वजनी गटातून खेळताना जगभरातल्या अव्वल मुष्टियोद्धय़ांना चीतपट करण्याची किमया अली यांनी केली होती. आयुष्याच्या उत्तरार्धात विविध आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र कारकीर्दीत सातत्याने जोरदार ठोसे लगावलेल्या अली यांनी सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.
३० वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत ५६ विजय व ५ हार अशा कामगिरीसह त्यांनी निवृत्ती स्वीकारली. जॉर्ज फोरमन, सोनी लिस्टन व जो फ्रेझियर या तुल्यबळ प्रतिस्पर्धीविरुद्धच्या अली यांच्या लढती प्रचंड गाजल्या. व्हिएतनाम युद्धात सहभागी होण्यास नकार दिल्याने अली यांच्यावर काही वर्षे बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यानंतर जिद्दीने पुनरागमन करत त्यांनी बॉक्सिंग क्षेत्रावर अधिराज्य गाजवले. सोनी लिस्टनला नमवल्यावर कॅसियुस मार्सेल्युस क्ले यांनी ‘मोहम्मद अली’ यांनी हे नाव धारण केले.
मोहम्मद अली हे केवळ महान खेळाडू नव्हते, तर एक दयाळू व खिलाडूवृत्ती लाभलेली व्यक्ती होती. त्यांनी अनेक खेळाडूंवर निर्णायक विजय मिळवला तरी ते कधीही आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला वैरी समजत नसत. आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला आलिंगन देत त्याच्या शैलीचे ते भरभरून कौतुक करीत असत.
– मॅनी पॅक्विआनो

अली हे आमच्या काळातील अतिशय धाडसी, पण तितकेच मनमिळाऊ खेळाडू होते. महान खेळाडू, जबरदस्त खिलाडूवृत्ती जपल्यामुळे ते प्रेरणेचे स्रोत होते. भरपूर लोकसंग्रह जमविण्याची कला त्यांना लाभली होती.
– बॉब आरुम

आम्ही सहृदयी खेळाडू गमावला आहे. बॉक्सिंगमध्ये माझ्यासह अनेक खेळाडूंना जगात अव्वल दर्जाचे स्थान मिळाले आहे, त्याचे श्रेय अली यांनाच द्यावे लागेल.
– फ्लॉइड मेवेदर

बॉक्सिंग खेळाने आत्माच गमावला आहे. आदर्श खेळाडू व श्रेष्ठ व्यक्ती आपण गमावली आहे.
– माइक टायसन

अली यांनी बॉक्सिंग खेळास नवसंजीवनी दिली. त्यांनी बॉक्सिंग खेळात रंगत निर्माण केली. त्यांच्या प्रेरणेमुळेच माझी कारकीर्द घडली. अनेक अडथळे आली तरी त्यावर हसतमुखाने कसे सामोरे जायचे ही शिकवण मला त्यांच्या करिअरद्वारे लाभली.
– ख्रिस जॉन

केवळ खेळाडू म्हणून नव्हे, तर एक आदर्श माणूस म्हणून त्यांनी लाखो चाहत्यांना जीवनात कसे खंबीरपणे उभे राहायचे याची शिकवण दिली.
– डॉन किंग