कर्णधार सूर्यकुमार यादवच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या दिवशी मध्य प्रदेशविरुद्धच्या वानखेडे स्टेडियमवरील लढतीत साडेतीनशेचा टप्पा ओलांडला खरा, मात्र दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेशच्या योगेश रावतने घेतलेल्या पाच बळींमुळे मुंबईला आपल्या धावसंख्येत केवळ २९ धावांची भर घालता आली आणि त्यांचा पहिला डाव ४०४ धावांमध्ये संपुष्टात आला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मध्य प्रदेशने दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद २२१ अशी मजल मारली आहे.
बडोद्याविरुद्धच्या शेवटच्या लढतीत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या योगेशची डावात पाच बळी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. मंगळवारी सकाळी ८ षटकांमध्ये अवघ्या १४ धावा देत योगेशने ५ बळी टिपले. योगेशच्या भेदक गोलंदाजीमुळे ४ बाद ३७५ वरून पुढे खेळणाऱ्या मुंबईचा पहिला डाव ४०४ धावांतच आटोपला. सूर्यकुमारने सर्वाधिक १३५ धावा केल्या. पुनीत दातेयने ३ बळी घेत योगेशला चांगली साथ दिली.
मध्य प्रदेशकडून जलाज सक्सेनाने १६ चौकारांसह ८५ धावांची खेळी केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा नमन ओझा (खेळत आहे ६०) तर देवेंद्र बुंदेला (खेळत आहे ४२) धावांवर खेळत आहेत. मध्य प्रदेशचा संघ अजूनही १८३ धावांनी पिछाडीवर आहे.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : १०३ षटकांत सर्वबाद ४०४ (सूर्यकुमार यादव १३५, अखिल हेरवाडकर ९७, सिद्धेश लाड ७३, योगेश रावत ५/७४) विरुद्ध मध्य प्रदेश (पहिला डाव) : ७२ षटकांत ३ बाद २२१ (जलाज सक्सेना ८५, नमन ओझा खेळत आहे ६०; विल्किन मोटा १/३३).