News Flash

मुंबईचा पलटवार!

क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, हे मुंबई आणि तामिळनाडू यांच्यातील रणजी सामन्यात पाहायला मिळाले.

आमची ५ बाद ५२ धावसंख्या झाल्यानंतर गमावण्यासारखे हाती काहीच नव्हते. तामिळनाडूच्या गोलंदाजांना वरचढ होऊ द्यायचे नाही, हे ठरवून सकारात्मक खेळ केला.

-लाडचे खणखणीत दीडशतक , विशाल दाभोळकरचे पाच बळी

 मुंबई २९४; तामिळनाडू ७ बाद ७३ 

क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, हे मुंबई आणि तामिळनाडू यांच्यातील रणजी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाहायला मिळाले. सर्वागसुंदर निखळ फलंदाजीचा आनंद देत सिद्धेश लाडने दीडशतक साकारले. मग विशाल दाभोळकरने तामिळनाडूची दुसऱ्या डावातील दयनीय अवस्था केली. या जोरावर मुंबईने तामिळनाडूवर तिसऱ्या रणजी सामन्यात जोरदार पलटवार केला. सिद्धेशच्या संस्मरणीय फलंदाजीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात २९४ धावा केल्या, तर विशालने पाच बळी मिळवत तामिळनाडूची तिसऱ्या दिवसअखेर ७ बाद ७३ अशी अवस्था केल्यामुळे मुंबईला सामना जिंकण्याची संधी असून तामिळनाडूकडे सध्याच्या घडीला २१३ धावांची आघाडी आहे.

तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्याच षटकात श्रीदीप मंगेला (२०) आणि सूर्यकुमार (४) यांना एम. मोहम्मदने माघारी धाडले. त्यानंतरच्या षटकात त्याने कर्णधार आदित्य तरेला भोपळाही फोडू न देता बाद केले आणि मुंबईची ५ बाद ५२ अशी दयनीय अवस्था केली. मुंबईवर फॉलोऑनचे संकट येण्याची शक्यता वाटत असताना सिद्धेशने धवल कुलकर्णीला साथीला घेत तामिळनाडूचा मारा कसा बोथट करता येईल, याचा उत्तम नमुना पेश केला. चांगला चेंडू सोडून देत वाईट चेंडूला मात्र सीमापार धाडण्यात सिद्धेशने धारिष्टय़ दाखवले. त्याची ही खेळी आत्मविश्वासपूर्ण होती. स्ट्रेट ड्राइव्हज, कव्हर ड्राइव्ह, कट, हूक, पूल हे फटके त्याने सहजपणे मारले. या दोघांनी संघाला उपहारापर्यंत दीडशे धावांचा पल्ला गाठून दिला.

उपाहारानंतरच्या दुसऱ्याच षटकात धवल बाद झाला. त्याने सिद्धेशला योग्य साथ देण्याची जबाबदारी पार पाडत १०१ चेंडूंचा सामना करत ७ चौकारांच्या जोरावर ३९ धावांची खेळी साकारली. सिद्धेश आणि धवल यांनी सहाव्या विकेटसाठी १०३ धावांची अनमोल भागीदारी साकारली. धवल बाद झाल्यावरही सिद्धेशने तामिळनाडूच्या गोलंदाजांवरचा प्रहार सुरूच ठेवला. रंगराजनला थेट सरळ षटकार लगावत त्याने संघाला दोनशे धावा पूर्ण करून दिल्या. त्यानंतरच्याच षटकात कव्हर्सला चौकार लगावत सिद्धेशने मोसमातील पहिले आणि कारकीर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले. शतक झाल्यावर हवेत फटके मारण्याचा मोह त्याने आवरला. त्याने जे मोठे फटके मारले ते थेट सीमेपारच जात होते. शार्दूल ठाकूर (२३) आणि बलविंदर संधू (१६) या तळाच्या फलंदाजांबरोबर त्याने अनुक्रमे ३८ आणि ४७ धावांची भागादारी रचत संघाची धावसंख्या वाढवत नेली. मिडविकेटला चौकार लगावत त्याने कारकीर्दीतील पहिले दीडशतक साजरे केले. पण त्यानंतर तो लगेच बाद झाला. तब्बल २७३ मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडलेल्या सिद्धेशने १८४ चेंडूंमध्ये १६ चौकार आणि सात चौकारांच्या जोरावर १५० धावांची अविस्मरणीय खेळी साकारली.

संक्षिप्त धावफलक

तामिळनाडू (पहिला डाव) : ४३४.

मुंबई (पहिला डाव) : ९३ षटकांत सर्व बाद २९४ (सिद्धेश लाड १५०, धवल कुलकर्णी ३९; एम. मोहम्मद ५/८६) तामिळनाडू (दुसरा डाव) : २७ षटकांत ७ बाद ७३ (मुरली विजय २९; विशाल दाभोळकर ५/४१)

आमची ५ बाद ५२ धावसंख्या झाल्यानंतर गमावण्यासारखे हाती काहीच नव्हते. तामिळनाडूच्या गोलंदाजांना वरचढ होऊ द्यायचे नाही, हे ठरवून सकारात्मक खेळ केला. या खेळीसाठी प्रशिक्षकांनी चांगला पाठिंबा दिला. विशालने पाच बळी मिळवत दमदार कामगिरी केली. अखेरच्या दिवशीही अशीच कामगिरी मुंबईकडून व्हावी, हीच आशा आहे.

– सिद्धेश लाड, मुंबईचा फलंदाज

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 4:24 am

Web Title: mumbai fight against tamil nadu in ranji trophy
टॅग : Ranji Trophy
Next Stories
1 सिंधूचा थरारक विजय
2 बीसीसीआयच्या कार्यकारिणी बैठकीत चेन्नई व राजस्थानचे भवितव्य ठरणार
3 भारताची ऑस्ट्रेलियावर मात; आज ब्रिटनशी अंतिम सामना
Just Now!
X