मुंबई इंडियन्सच्या संघाचे प्रतिनिधीत्व केलेला डावखुरा फलंदाज अभिषेक नायर याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. अभिषेक नायरने ३६ व्या वर्षी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. मुंबई रणजी संघात खेळताना त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. याशिवाय टीम इंडियाचेही प्रतिनिधित्व करण्याची त्याला संधी मिळाली होती. तसेच IPL मध्येही त्याने मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सहारा पुणे वॉरियर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

मी प्रथम श्रेणी क्रिकेटला रामराम ठोकत आहे. विंडिजमध्ये त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाला मदत करण्यासाठी मी गेलो होतो. तेव्हाच BCCI आणि मुंबई क्रिकेट संघटनेला माझ्या निवृत्ती संबंधीचे पत्र पाठवले. माझ्या उमेदीच्या काळात आणि कठीण प्रसंगात मला साथ देणाऱ्या क्रिकेट संघटनांचा, मला लाभलेल्या प्रशिक्षकांचा, संघातील सहकारी खेळाडूंचा, कुटुंबीयांचा आणि मित्रमंडळींचा आभारी आहे, असे नायरने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

३६ वर्षीय अभिषेक नायरने मुंबई रणजी संघाकडून ९९ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. २०१७ -१८ च्या सत्रात मात्र त्याला मुंबईच्या संघातून वगळण्यात आले. त्यानंतर तो पुदुच्चेरी संघाकडून चार सामने खेळला. त्यातील शेवटच्या सामन्यात त्याने सिक्कीम विरूद्ध ७६ धावा केल्या आणि ५ गडी टिपले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याची संधीदेखील त्याला मिळाली होती. पण त्याने अतिशय खराब कामगिरी केली. त्यामुळे त्याला पुन्हा संधी मिळू शकली नाही.