रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा जिंकून आत्मविश्वास उंचावणाऱ्या मुंबई संघाच्या रणजी करंडक अभियानाला गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबईची कर्नल सिंग स्टेडियमवर सलामीची लढत रेल्वेशी होणार आहे. देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत झालेल्या दुखापतीमुळे पृथ्वी शॉ पहिल्या सामन्याला मुकणार आहे. त्याची उणीव मुंबईला तीव्रतेने भासेल.

श्रेयस, सिद्धेश लाड, सूर्यकुमार यादव, अखिल हेरवाडकर, आदित्य तरे यांच्यावर मुंबईच्या फलंदाजीची मदार आहे. तसेच धवल कुलकर्णीवर वेगवान माऱ्याची धुरा असेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्यामुळे शार्दूल ठाकूरसुद्धा या सामन्यात खेळू शकणार नाही.

‘अ’ गटात मागील हंगामातील रणजी विजेते विदर्भ, बलाढय़ कर्नाटक, २०१६-१७ चे विजेते गुजरात, २०१५-१६ चे विजेते सौराष्ट्र, छत्तीसगढ आणि रेल्वे यांचाही समावेश असल्यामुळे मुंबईला बाद फेरी गाठण्यासाठी कडवे आव्हान असेल. मात्र ४२व्या रणजी विजेतेपदाच्या निर्धारानेच मुंबईचा संघ उतरणार आहे.

३७ यंदाच्या रणजी हंगामात विक्रमी ३७ संघ सहभागी झाले असून, यापैकी मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, उत्तराखंड, सिक्किम, नागालँड, मेघालय, बिहार आणि पुडिचेरी हे आठ संघ प्रथमच सहभागी होत आहेत.