अडखळत्या सुरुवातीनंतर स्वत:ला सावरत रणजी करंडक स्पध्रेत अस्तित्व टिकवणाऱ्या मुंबई संघाला बुधवारपासून सुरू होणाऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत गतविजेत्या कर्नाटक संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. दिग्गज प्रतिस्पध्र्यातील अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा दोन्ही संघांच्या कर्णधारांनीही निर्धार व्यक्त केला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कर्नाटकला एकही पराभव पत्करावा लागलेला नाही. नोव्हेंबर २०१२ मध्ये ओडिशाकडून त्यांनी अखेरचा पराभव पत्करावा लागला होता. असे असले तरी यंदाच्या सत्रात त्यांना दोन लढतींत चढउतारांचा सामना करावा लागला आहे. वानखेडेवर झालेल्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात आणि म्हैसूर येथे झालेल्या बडोद्याविरुद्धच्या सामन्यात कर्नाटक  पहिल्या डावात पिछाडीवर पडला होता, तरीही जबरदस्त पुनरागमन करत त्यांनी विजयी मालिका खंडित होऊ दिली नाही. ८ सामन्यांत त्यांनी चार विजय आणि चार सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवले. मुंबईला मात्र सुरुवातीपासूनच झगडावे लागले आहे. त्यांना ८ सामन्यांत दोन विजय, दोन पराभव आणि चार अनिर्णित निकालांवर समाधान मानावे लागले आहे.

संभाव्य संघ
मुंबई : आदित्य तरे (कर्णधार), अखिल हेरवाडकर, अभिषेक नायर, श्रीदीप मंगेला, सूर्यकुमार यादव, विल्किन मोटा, श्रेयस अय्यर, तुषारदेशपांडे, सिद्धेश लाड, मैराज खान, सुफियान शेख, हरमित सिंग, शार्दूल ठाकूर, बलविंदर सिंग संधू, निखिल पाटील (ज्यु.)
कर्नाटक : विनय कुमार (कर्णधार) मयांक अग्रवाल, श्रीनाथ अरविंद, शिशिर भावने, सी गौतम, श्रेयस गोपाल, कुणाल कपूर, अबरार काझी, अभिमन्यू मिथुन, करुण नायर, मनीष पांडे, उदित पटेल, रवीकुमार समर्थ, एच सरथ, रॉबिन उथप्पा.

फलंदाजांची तगडी फौज
कर्नाटकच्या फलंदाजांची फौज फॉर्मात आहे. त्यांच्या पाच फलंदाजांनी ४००हून अधिक धावा केल्या आहेत. त्यात भारतीय संघात नुकताच स्थान मिळवलेल्या लोकेश राहुलने  उत्तर प्रदेशविरुद्धच्या लढतीत ३३७ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली होती. त्यापाठोपाठ श्रेयस गोपाळ (५५८ धावा), रॉबिन उथप्पा (५१७), मनीष पांडे (४४७) आणि सी. एम. गौतम (४००) सातत्याने धावा काढत आहेत. त्यांची ही फौज मुंबईच्या गोलंदाजांवर आक्रमण करण्यासाठी पुरेशी आहे.

मुंबईच्या फलंदाजीत सुधारणा, पण गोलंदाज मिळेना
सुरुवातीच्या अपयशातून स्वत:ला सावरत मुंबईच्या फलंदाजांनी हळूहळू का होईना लय पकडली आहे. श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांनी यंदाच्या सत्रात दोन शतके ठोकली आहेत. अय्यरने आत्तापर्यंत ७४४ धावा चोपल्या आहेत. त्यांच्यासोबतीला आदित्य तरे, अखिल हेरवाडकर, अभिषेक नायर, सिद्धेश लाड ही मजबूत फळी आहेच. गोलंदाजीत मात्र मुंबईला शार्दूल ठाकूरवरच विसंबून राहावे लागणार आहे.

महाराष्ट्रापुढे तामिळनाडूचे आव्हान
कोलकाता : आंध्र प्रदेशविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत सनसनाटी विजय मिळविल्यामुळे महाराष्ट्राचे मनोधैर्य उंचावले आहे. त्यांना रणजी क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य लढतीत बुधवारपासून बलाढय़ तामिळनाडूचे आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.  कसोटीतील सलामीवीर मुरली विजय, अभिनव मुकुंद, दिनेश कार्तिक, विजय शंकर, तसेच बाबा अपराजित व बाबा इंद्रजित अशी भक्कम फलंदाजी आहे. येथील खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल मानली जात आहे. समाद फल्लाह, अनुमप संकलेचा, श्रीकांत मुंढे, डॉमिनिक मुथ्थुस्वामी हे महाराष्ट्राचे गोलंदाज त्यांना किती रोखून धरतात यावरच महाराष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे.