रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना आजपासून; तरे, नायर यांच्या अनुभवावर भिस्त

आतापर्यंत तब्बल ४१ वेळा रणजी करंडक स्पर्धेचे जेतेपद पटकावत इतिहास रचलेला मुंबईचा संघ या वेळी अंतिम फेरीत धडकला असून ऐतिहासिक जेतेपद पटकावण्यासाठी तो सज्ज झाला आहे. दुसरीकडे गुजरातच्या संघाने तब्बल ६६ वर्षांनी रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याने ऐतिहासिक जेतेपद पटकावण्यासाठी ते आसुसलेले असतील. होळकर स्टेडियमवर मंगळवारपासून पाच दिवसीय रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीला सुरुवात होत असून या वेळी कोणता संघ जेतेपदाला गवसणी घालतो, याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना असेल.

उपांत्य फेरीत मुंबईने तामिळनाडूवर सहा विकेट्स राखत दणदणीत विजय मिळवला होता. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉ याने शतक लगावत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला होता. त्याचबरोबर कर्णधार आदित्य तरे, अभिषेक नायर, सिद्धेश लाड हे चांगल्या फॉर्मात आहेत. पण श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. पृथ्वीला या सामन्यात खेळण्याची संधी मिळणार असली तरी त्याचा सहकारी या वेळी बदलू शकतो. कारण प्रफुल्ल वाघेलाला आतापर्यंत छाप पाडता आलेली नाही आणि दुसरीकडे सलामीवीर अखिल हेरवाडकर दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे या सामन्यात अखिलला खेळण्याची संधी मिळू शकेल. गोलंदाजीमध्ये विजय गोहिल, तुषार देशपांडे ही युवा जोडगोळी भेदक मारा करत आहेत. या सामन्यात डावखुरा फिरकीपटू विशाल दाभोळकरला खेळवणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि मध्यमगती गोलंदाज बलविंदर सिंग संधू यांच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील.

गुजरातने उपांत्य फेरीत झारखंडवर अनपेक्षितपणे विजय मिळवला होता. या विजयासह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत सहा बळी मिळवले होते. पण भारताचा इंग्लंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना १५ जानेवारीला होणार असल्याने जसप्रीतला अंतिम फेरीला मुकावे लागणार आहे. गुजरातसाठी हा सर्वात मोठा धक्का असेल, पण त्यांच्याकडे आर. पी. सिंगसारखा अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. त्याला या वेळी मेहुल पटेल साथ देईल. गुजरातची फलंदाजी हे बलस्थान आहे. पार्थिव पटेलसारखा अनुभवी खेळाडू संघाची कर्णधारपदाची कमान सांभाळत आहे. त्याचबरोबर सलामीवीर समित गोयल या हंगामात हजार धावा करण्याच्या समीप आहे. मनप्रीत जुनैजासारखा चांगला अष्टपैलू संघात असून त्याने आतापर्यंत ६२८ धावा करत ९ बळीही मिळवले आहेत. प्रियांक पांचाळ आणि रुष कलारिया हे दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्मात आहे.

दोन्ही संघांचा विचार केला तर ही लढत अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना एका थरारक लढतीचा अनुभव या सामन्याद्वारे घेता येईल.

संघ

  • मुंबई : आदित्य तरे (कर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, अखिल हेरवाडकर, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, अभिषेक नायर, सिद्धेश लाड, तुषार देशपांडे, विजय गोहिल, शार्दूल ठाकूर, बलविंदर संधू.
  • गुजरात : पार्थिव पटेल (कर्णधार, यष्टीरक्षक), समित गोहेल, प्रियांक पांचाळ, भार्गव मेराई, मनप्रीत जुनैजा, राजूल भट्ट, चिराग गांधी, रुष कलारिया, आर. पी. सिंग, मेहुल पटेल, हार्दिक पटेल.
  • वेळ : सकाळी ९.०० वा. पासून.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर