करुण नायरनंतर आता मुरली विजयचाही निवड समितीवर थेट आरोप

काही दिवसांपूर्वीच करुण नायरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आपल्याला वगळण्यात आल्यासंबंधी निवड समितीने काहीही कल्पना दिली नव्हती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. आता यामध्ये भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूची भर पडली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्या दोन सामन्यांनतर संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेल्या सलामीवीर मुरली विजयनेही हाच आरोप निवड समितीवर केला आहे. आपल्यालाही एक प्रकारे बळीचा बकरा बनवल्यामुळे व्यथित झालेल्या विजयच्या या आरोपाने संघाच्या निवड प्रक्रियेविषयी चर्चानी पुन्हा एकदा जोर धरला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटीत विजयने अनुक्रमे २०, ६, ० व ० अशी खराब कामगिरी केली. त्यामुळे त्याला पुढील तीनही कसोटींतून वगळण्यात आले, त्याशिवाय वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतूनही त्याला डच्चू देण्यात आला. विजय म्हणाला, ‘‘इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीतून मला वगळण्यात आल्यावर निवड समितीच्या कोणत्याही सदस्याने माझ्याशी संवाद साधलेला नाही. दुसऱ्या सामन्यापूर्वी माझा त्यांच्याशी अखेरचा संवाद झालेला होता.’’

करुण नायरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आल्यामुळे भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्यावर ताशेरे ओढले होते. याविषयी विजय म्हणाला, ‘‘संघातील निवडविषयी हरभजनने व्यक्त केलेल्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. एखाद्या खेळाडूला त्याला संघाबाहेर बसवण्यात येणार असल्यास निदान त्याची पूर्वकल्पना द्यावी, असे मला वाटते. यामुळे खेळाडूला त्याच्या चुकांची व येणाऱ्या आव्हानांची जाणीव होते.’’ इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून डच्चू देण्यात आल्यानंतर विजयने इंग्लिश कौंटी स्पर्धेत ५६, १००, ८५, ८० असा धावांचा पाऊस पाडला.

प्रसाद यांनी आरोप फेटाळला

करुण नायरनंतर मुरली विजयनेही निवड समितीवर केलेला आरोप साफ खोटा आहे, असे म्हणून एमएसके प्रसाद यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, ‘‘निवड समितीचे सदस्य देवांग गांधी यांनी विजयला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमधून मध्यातच वगळण्यात आल्यावर स्वत: त्याच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे विजयच्या आरोपाने मला आश्चर्याचा धक्का बसला आहे.’’