माझ्या सुरुवातीच्या काळात महिला बॉक्सिंगचा ऑलिम्पिकमध्ये किंवा आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग नव्हता. पण आता महिला बॉक्सिंगने ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये थाटात स्थान मिळवले आहे. या स्पर्धामध्ये देशाचे नाव उज्ज्वल करतील, असे माझ्यापेक्षाही सर्वोत्तम बॉक्सर मला घडवायचे आहेत, अशी इच्छा पाच वेळा विश्वविजेती ठरलेली आणि लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिने व्यक्त केली.
मुंबईच्या दी प्रेस क्लबतर्फे आयोजित एका कार्यक्रमात मेरी कोम म्हणाली, ‘‘एक दिवस मी निवृत्त होणार आहे. देशाला चांगले बॉक्सर मिळवून देण्यासाठी मी २००७पासून बॉक्सिंग अकादमी सुरू केली. अकादमीचे बांधकाम सुरू असल्यामुळे सध्या आम्ही मोकळ्या मैदानातच सराव करत आहोत. स्वत:कडील पैसे खर्च करून मी अकादमी चालवते. आम्ही राज्य आणि राष्ट्रीय विजेते बॉक्सर घडवले आहेत. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा अभिमानाने फडकावतील, असे बॉक्सर मला निर्माण करायचे आहेत.’’

ऑलिम्पिक सुवर्णपदक हेच ध्येय
‘‘चार महिन्यांपूर्वी बाळाला जन्म दिल्यामुळे आणि काही आठवडय़ांपूर्वी माझ्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे मी वर्षभर विश्रांती घेणार आहे. पण पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेआधी मी सरावाला सुरुवात करणार आहे. त्यानंतरच्या महत्त्वाच्या स्पर्धामध्ये सहभागी होऊन २०१६ ऑलिम्पिकसाठी स्थान मिळवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक हेच माझे ध्येय आहे!’’

चित्रपटामुळे बॉक्सिंगला चालना मिळेल
‘‘माझ्या आयुष्यावर, संघर्षांवर बेतलेल्या चित्रपटातील नायिकेची भूमिका प्रियांका चोप्रा करणार आहे. प्रसुतीमुळे मी तिला बॉक्सिंगचे धडे देऊ शकले नाही. या चित्रपटामुळे बॉक्सिंग या खेळाला चालना मिळेल तसेच युवा पिढी विशेषत: मुली बॉक्सिंगकडे वळतील, अशी आशा आहे!’’

स्वसंरक्षणासाठी बॉक्सिंग शिकण्याची गरज
‘‘एकदा चर्चमध्ये जात असताना रिक्षावाल्याने माझी छेड काढली. तेव्हा मी बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली होती. मणिपूरच्या पारंपारिक गणवेशात असल्यामुळे मला स्वत:चा बचाव करता येत नव्हता. अशा परिस्थितीतही मी त्या रिक्षावाल्याला चोप दिला. निर्जन रस्त्यावरून जाणारे दोन फुटबॉल प्रशिक्षक माझी आरडाओरड ऐकून माझ्याजवळ आले. आम्ही तिघांनी रिक्षावाल्याला बेदम चोपले. सध्या महिलांवर होणारे अन्याय टाळण्यासाठी महिलांनी स्वत: सक्षम होण्याची गरज आहे. त्यासाठी महिलांनी बॉक्सिंग, ज्युदो, कराटेसारखे प्रकार शिकण्याची गरज आहे.’’