इंडियन ग्रां. प्रि. अ‍ॅथलेटिक्स

भारताचे अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक निकोलाय स्नेसारेव्ह शुक्रवारी राष्ट्रीय क्रीडा संस्थेमधील (एनआयएस) आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळून आले, अशी माहिती भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) दिली.

भारताचे मध्यम आणि लांब पल्ल्याचे प्रशिक्षक असलेले ७२ वर्षीय स्नेसारेव्ह हे दोन वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा प्रशिक्षकपदी रुजू झाले होते. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी इस्पितळात पाठवण्यात आला आहे.

‘‘इंडियन ग्रां. प्रि अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी ते बेंगळूरुहून पतियालात आले होते, पण स्पर्धेसाठी न आल्याने त्यांची सहप्रशिक्षकांनी शोधाशोध सुरू केली. त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होते. दरवाजा तोडल्यानंतर ते पलंगावर झोपलेले आढळून आले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या डॉक्टर्सनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हा अहवाल आल्यावरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल,’’ असे ‘एएफआय’चे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी सांगितले.

चोप्राचा नवा राष्ट्रीय विक्रम

अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्राने यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करत इंडियन ग्रां. प्रि. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद केली. नीरजने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत शुक्रवारी ८८.०७ मीटर अशी कामगिरी नोंदवली. नीरजने पाचव्या प्रयत्नांत सर्वोत्तम कामगिरी केली. त्याचबरोबर त्याने २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत नोंदवलेला ८८.०६ मीटरचा विक्रम मागे टाकला.