ऑस्ट्रेलियन खुली  टेनिस स्पर्धा

मोसमातील पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी पुरेसा सराव केला नसला तरीही अग्रमानांकित राफेल नदाल हा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद मिळविण्यासाठी आशावादी आहे. या स्पर्धेतील मुख्य फेरीला सोमवारी प्रारंभ होत आहे.

नदालने आतापर्यंत कारकीर्दीत महत्त्वाची अशी सोळा विजेतेपदे मिळवली आहेत. मात्र त्याला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत अपेक्षेइतके वर्चस्व गाजवता आलेले नाही. गतवर्षी येथे त्याला रॉजर फेडररकडून अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. नदाल म्हणाला, ‘‘मी प्रथमच येथे सराव सामन्यांमध्ये भाग न घेता उतरलो आहे. माझ्यासाठी ही नवीनच गोष्ट आहे. तरीही जिद्दीने सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सहभागी झालो आहे. कुयांग क्लब येथे केवळ प्रदर्शनीय सामना खेळून या स्पर्धेसाठी तयार झालो आहे.

मोसमातील पहिलीच स्पर्धा असल्यामुळे प्रत्येक खेळाडूला येथे आपली तयारी किती झाली आहे, याचे आत्मपरीक्षण करता येते. येथे सहभागी होणारा प्रत्येक खेळाडू खऱ्या अर्थाने शून्यापासूनच तयारी करीत असतो. मीदेखील त्यापैकी एक खेळाडू आहे. तरीही खेळाचा आनंद घेण्यासाठी उत्सुक असतो.’’

जोकोविचची कसून तयारी

ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत सहा वेळा विजेतेपद मिळवणारा नोव्हाक जोकोविच हा दुखापतीमधून शंभर टक्के तंदुरुस्त झाला असल्यामुळे पुन्हा त्याच्याकडून नेत्रदीपक कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. दुखापतीमुळे तो सहा महिने टेनिसपासून दूर होता. तो म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियन स्पर्धा माझी आवडीची स्पर्धा आहे. गतवर्षी काही स्पर्धामध्ये भाग घेता आला नाही याचे दु:ख जाणवत आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धा टाळणे हे शक्य नाही. शेवटपर्यंत तंदुरुस्ती टिकावी अशीच मी प्रार्थना करीन. जगातील सध्याच्या महान खेळाडूंवर मात करण्याची माझ्याकडे निश्चित क्षमता आहे. येथे पहिल्या फेरीत अमेरिकेच्या डोनाल्ड यंगचे आव्हान पार करावे लागणार आहे. मानसिकदृष्टय़ा खंबीर असलो की आपोआपच शारीरिक तंदुरुस्ती वाढते. विजेतेपदाच्या मार्गात वाढत्या वयाचा अडथळा नसतो हे फेडरर व नदाल यांनी दाखवून दिले आहे. माझ्यापुढे त्यांचाच आदर्श आहे.’’

तंदुरुस्त नसूनही वॉवरिंका खेळणार

ग्रँड स्लॅमसाठी आवश्यक असणारी शारीरिक तंदुरुस्ती नसली तरीही येथील स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे स्टानिस्लास वॉवरिंकाने सांगितले. तो म्हणाला, ‘‘गतवर्षी विम्बल्डन स्पर्धेनंतर मी स्पर्धात्मक टेनिसपासून दूर राहिलो आहे. अद्यापही गुडघा शंभर टक्के तंदुरुस्त नाही. तरीही ग्रँड स्लॅम स्पर्धेतील सहभाग प्राधान्याचीच गोष्ट असते. पहिल्या फेरीत रिकार्डस बेराकिन्स याच्याशी खेळावे लागणार आहे. त्याला बलाढय़ खेळाडू म्हणूनच मी मानणार आहे. शेवटपर्यंत सर्वोच्च कौशल्य दाखविण्याचे ध्येय आहे.’’