आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू संदीप यादवची माहिती

नरसिंग यादव प्रकरणाचा निकाल एप्रिल महिन्यात लागेल, अशी माहिती त्याचा सहकारी आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू संदीप यादवने दिली आहे. जुलै महिन्यात झालेल्या उत्तेजक चाचणीत नरसिंग आणि संदीप दोषी आढळले होते. त्यामुळे नरसिंगला रिओ ऑलिम्पिकला मुकावे लागले होते.

‘‘मी आणि नरसिंग गुन्हे अन्वेषण विभागाच्या भेटीसाठी २२ आणि २३ डिसेंबरला गेलो होतो. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. कारण पुरावे शोधण्याचे काम त्यांचे आहे आणि ते करत आहेत. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर नरसिंग प्रकरणाचा निकाल एप्रिल महिन्यामध्ये लागेल, असे आम्हाला सांगण्यात आले,’’ अशी माहिती संदीपने दिली.

‘‘सध्याच्या घडीला ‘साइ’मधील सर्व अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे, त्याचबरोबर तेथील खेळाडूंची चौकशीही सुरू आहे. येथील कँटिनमधून हा प्रकार घडला असे म्हटले जाते. त्यामुळे तिथल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी सुरू आहे. छत्रसाल येथील जितेश नावाच्या मुलाने हे सारे केले असल्याचा संशय आहे, त्याचीही चौकशी सुरू आहे. आम्ही तर या प्रकरणात निर्दोष आहोतच आणि तेच सिद्ध होणार आहे,’’ असे संदीप सांगत होता.

जुलै महिन्यामध्ये झालेल्या उत्तेजक सेवन चाचणीमध्ये संदीपही दोषी आढळला होता. त्याच्या शरीरामध्ये उत्तेजकाचे प्रमाण आढळले असल्यामुळे त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली होती. संदीप आणि नरसिंग चांगले मित्र असल्यामुळे एकाच खोलीमध्ये ते दोघे राहात होते. नरसिंगबरोबर संदीपही उत्तेजन सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे हे कारस्थान असल्याचेच भारतीय कुस्ती महासंघाने म्हटले होते.

‘‘आम्ही उत्तेजन सेवन करण्याचा प्रश्नच नाही, कारण आमची कामगिरी बोलकी आहे. आम्ही आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चांगली कामगिरी केली आहे. आमच्याबाबतीत कुणी असे करेल, हे आमच्या ध्यानीमनीही नव्हते. कुस्ती स्पर्धेत जिंकण्याची ईष्र्या प्रत्येकाची असते. प्रतिस्पध्र्याला चीतपट करण्याचा प्रयत्न सारे करत असतात, पण ते फक्त स्पर्धेच्या वेळीच. स्पध्रेच्या निवड प्रक्रियेतून देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूला प्रत्येकानेच पाठिंबा द्यायला हवा, पण तसे न झाल्यानेच हे कारस्थान घडले असावे,’’ असे संदीपने सांगितले.

ग्रीको-रोमन आणि फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये थोडासाच फरक संदीप हा ग्रीको-रोमन प्रकारात कुस्ती खेळतो. पण मंगळवारी अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत तो फ्री-स्टाईल प्रकारात एक प्रदर्शनीय सामना खेळला. याबद्दल विचारले असता संदीप म्हणाला की, ‘‘हे कुस्तीचे दोन भिन्न प्रकार असले तरी त्यासाठी जास्त वेगळा सराव करावा लागत नाही. ग्रीको-रोमन प्रकारात कंबरेच्या वरच्या बाजूंना जास्त जोर लावावा लागतो. मी आणि नरसिंग चांगले मित्र आहोत, पण दोघांचे कुस्ती खेळण्याचे प्रकार वेगळे आहेत. त्यामुळे मी कधी नरसिंगला फ्री-स्टाईलच्या सरावात मदत करतो, त्याचाच मला फायदा झाला.’’