नागपूर येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत, पुरुषांच्या अंतिम सामन्यात धक्कादायक निकालाची नोंद झालेली आहे. या हंगामात ४ सुपर सीरिज स्पर्धांची विजेतेपदं पटकावणारा किदम्बी श्रीकांत अंतिम फेरीत एच. एस. प्रणॉयकडून पराभूत झाला आहे. प्रणॉयने अंतिम फेरीत श्रीकांतवर २१-१५, १६-२१, २१-७ अशी मात करत राष्ट्रीय स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं.

अवश्य वाचा – बॅडमिंटनमधील चीनी वर्चस्व लवकरच संपुष्टात येईल : किदम्बी श्रीकांत

पहिल्या सेटमध्ये श्रीकांतने आक्रमक खेळाला सुरुवात केली. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीच्या क्षणांमध्ये श्रीकांतने ३-० अशी आघाडी घेतली होती. काहीकाळासाठी श्रीकांतने ही आघाडी ७-५ अशी टिकवली. मात्र यानंतर प्रणॉयने आपला अनुभव पणाला लावत सेटमध्ये ९-९ अशी बरोबरी साधली. मात्र पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत श्रीकांतने ११-१० अशी एका गुणाची आघाडी आपल्याकडे राखली. मात्र मध्यांतरानंतर प्रणॉयने सेटमध्ये दमदार पुनरागमन करत श्रीकांतला जोरदार धक्का दिला. एका गुणाने पिछाडीवर पडलेल्या प्रणॉयने सेटमध्ये १९-१३ अशी भक्कम आघाडी घेतली. श्रीकांतने आपल्या हातातून निसटलेली आघाडी परत मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रणॉयने २१-१५ अशा फरकाने सेट आपल्या खिशात घालत सामन्यात आघाडी घेतली.

पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये श्रीकांत प्रणॉयला कशी लढत देतो यावर सामन्याचा निकाल अवलंबुन होता. अपेक्षेप्रमाणे श्रीकांतने प्रणॉयला दुसऱ्या सेटमध्ये चांगली टक्कर दिली. दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीच्या क्षणांमध्ये प्रणॉयने आपल्याकडे ८-३ अशी आघाडी ठेवली होती. यादरम्यान श्रीकांतने केलेल्या चुकांचा फायदा प्रणॉयला मिळाला. मात्र यानंतर श्रीकांतने सेटमध्ये जोरदार मुसंडी मारत मध्यांतरापर्यंत ११-१० अशी एका गुणाची आघाडी घेतली. मध्यांतरानंतर काहीकाळ दुसरा सेट बरोबरीत सुरु होता. मात्र श्रीकांतने आपला सर्व अनुभव पणाला लावत प्रणॉयला बॅकफूटला ढकललं. अखेर श्रीकांतने दुसरा सेट २१-१६ अशा फरकाने खिशात घालत सामन्यात बरोबरी साधली.

दुसऱ्या सेटमध्ये श्रीकांतने दणक्यात पुनरागमन केल्यामुळे अंतिम सेट रंगतदार होईल अशी सर्वांना आशा होती. मात्र प्रत्यक्षात तिसरा सेट कमालीचा एकतर्फी झालेला पहायला मिळाला. प्रणॉयने तिसऱ्या सेटमध्ये सुरुवातीपासून सामन्यात मोठी आघाडी घेतली. मध्यांतरापर्यंत प्रणॉयने सेटमध्ये ११-३ अशी आघाडी घेतली. यादरम्यान प्रणॉयच्या खेळापुढे श्रीकांत हतबल झालेला पहायला मिळाला. अखेर मध्यांतरानंतर श्रीकांतला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी न देता प्रणॉयने २१-७ या फरकाने तिसरा सेट आणि सामनाही आपल्या नावे केला. एच. एस. प्रणॉयचं राष्ट्रीय स्पर्धेतलं हे पहिलं विजेतेपद ठरलं.