बोल्टचा भेदक मारा; पाहुण्यांचा डाव ७४ धावांत संपुष्टात

ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्याचा सामना करण्यात पाकिस्तानचा संघ अपयशी ठरला आणि न्यूझीलंडने तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट लढतीत १८३ धावांनी विजय मिळवला. या निकालासह न्यूझीलंडने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. यजमानांच्या २५७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ २८ षटकांत ७४ धावांवर तंबूत परतला. बोल्टने १७ धावांत ५ बळी टिपले.

प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडने कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर ५० षटकांत २५७ धावा उभ्या केल्या. सलामीवीर मार्टिन गप्तिल आणि टॉम लॅथम यांनी या धावसंख्येत छोटेखानी हातभार लावला. या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचे फलंदाज अपयशी ठरले. बोल्टने सलामीच्या तीन फलंदाजांना बाद पाकिस्तानला मोठा धक्का दिला. त्याला कॉलीन मुन्रो आणि लॉकी फग्र्युसन यांनी प्रत्येकी दोन बळी टिपून चांगली साथ दिली. अकराव्या क्रमांकावर आलेल्या रुम्मान रईसच्या १६ धावा पाकिस्तानकडून सर्वाधिक वैयक्तिक धावा ठरल्या.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड : सर्वबाद २५७ (केन विलियम्सन ७३, रॉस टेलर ५२, मार्टिन गप्तिल ४५, टॉम लॅथम ३५; रुम्मान रईस ३/५१, हसन अली ३/५९) वि. वि. पाकिस्तान २७.२ षटकांत सर्वबाद ७४ (रुम्मान रईस १६; ट्रेंट बोल्ट ५/१७, कॉलीन मुन्रो २/१०, लॉकी फग्र्युसन २/२८); सामनावीर : ट्रेंट बोल्ट.