तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाल्यानंतर निर्णायक वन-डे सामन्यासाठी भारत आणि न्यूझीलंडच्या संघांचं कानपूरमध्ये आगमन झालंय. रविवारी ग्रीनपार्क मैदानावर हा सामना रंगणार आहे. आतापर्यंत ग्रीनपार्क मैदानात अनेक आंतराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. भारताने आपली ५०० वी कसोटी न्यूझीलंडविरुद्ध याच मैदानात खेळली होती.

अवश्य वाचा – विराटचा तो दावा मूर्खपणाचा – स्टिव्ह स्मिथ

भारत आणि न्यूझीलंडच्या संघातील खेळाडूंचं यावेळी खास स्वागत करण्यात आलं. गुलाबाचं फुल आणि शाल देऊन दोन्ही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. २०१६ साली. भारताच्या ५०० व्या कसोटीसाठी याच मैदानावर खास केक तयार करण्यात आला होता. या सामन्यात विजय मिळवणारा संघ मालिकाविजेता ठरेल. या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडने पराभवाचा धक्का दिला होता. या पराभवामुळे आयसीसीच्या जागतिक क्रमवारीत भारताने आपलं पहिलं स्थानही गमावलं होतं. मात्र पुण्यातील गहुंजे स्टेडीयमवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर मात करत मालिकेत बरोबरी साधली.

‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीने दुसऱ्या सामन्याआधी स्टिंग ऑपरेशन करत एकच खळबळ उडवून दिली होती. पुण्याच्या मैदानाचे पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी पैसे घेऊन खेळपट्टी तयार किंवा बिघडवता येत असल्याचं मान्य केल्यामुळे दुसऱ्या सामन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. बुकी बनून आलेल्या पत्रकाराला साळगावकर यांनी खेळपट्टीची तपासणी करताना हटकलं नाही. यामुळे साळगावकर यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली. मात्र, आयसीसीने या सामन्याला हिरवा कंदील दिला आणि भारताने मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे कानपूरच्या सामन्यात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.