जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांनी सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दर्जेदार वेगवान माऱ्याचा प्रत्यय घडवत वेलिंग्टनच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशाराच जणू न्यूझीलंडला दिला आहे.

बुमरा (११ षटकांत १८ धावांत २ बळी) आणि शमी (१० षटकांत १७ धावांत ३ बळी) ७४.२ षटकांत न्यूझीलंड एकादश संघाचा पहिला डाव २३५ धावांत गुंडाळला. उमेश यादव (१३ षटकांत ४९ धावांत २ बळी) आणि नवदीप सैनी (१५ षटकांत ५८ धावांत २ बळी) यांनी अधिक षटके टाकली. परंतु बुमरा आणि शमी यांनी यजमान फलंदाजांना अधिक त्रस्त केले. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात आक्रमक फलंदाजी करीत बिन बाद ५३ धावा केल्या. पृथ्वी शॉ ३५ आणि मयांक अगरवाल २३ धावांवर खेळत आहेत.